बुटीबाेरी : चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या रुईखैरी येथील तरुणाचा जंगलातील झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. ही घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणी बाेरधरण येथील जंगलात बुधवारी (दि.१६) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मनोज पांडुरंग बोरले (३५, रा. रुईखैरी, बुटीबोरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत मनोज हा बुटीबोरी एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामावर हाेता. शनिवारी (दि.१२) तो नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने सकाळी कामावर जाण्याकरिता घरून निघाला हाेता. सायंकाळ हाेऊनही मनाेज घरी न परतल्याने त्याची पत्नी व शेजाऱ्यांनी कंपनी व परिसरात विचारपूस केली. मात्र मनोज सकाळी कंपनीमध्ये आला नाही, असे कंपनीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वत्र शाेधाशाेध करूनही मनोजचा कुठेच थांगपत्ता लागत नसल्याने नातेवाईकांनी शनिवारी रात्रीच बुटीबोरी पाेलीस ठाणे गाठून त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार नाेंदविली.
दरम्यान, बुटीबाेरी पाेलिसांनी मनाेजच्या माेबाईलचे लाेकेशन तपासले असता, ताे वर्धा जिल्ह्यातील हिंगणी बाेरधरण जंगलात असल्याचे आढळले. पाेलिसांनी तपासचक्रे फिरविली मात्र त्यात त्यांना यश आले नाही. अशात बुधवारी सकाळी मनाेजचा मृतदेह बाेरधरण जंगलात एका झाडाला लटकला असल्याची बातमी कळताच मनाेजच्या पत्नीने हंबरडा फाेडला. सेलू पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या सुपूर्द केला.
मनाेजची आत्महत्या नसून, घातपात असल्याचा आराेप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. शिवाय, त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने पाेलिसांनी याप्रकरणी सखाेल चाैकशीची मागणी त्याच्या निकटवर्तीयांनी केली आहे.
===Photopath===
160621\img_20210616_151324.jpg
===Caption===
मृतक - मनोज पांडुरंग बोरले