नागपूर/दर्यापूर : नागपूरच्या उपमुख्य श्रम आयुक्तांच्या केंद्रीय कार्यालयात कार्यरत असलेले श्रम प्रवर्तन अधिकारी अमित नेहरा यांचा मृतदेह दर्यापूर तालुक्यातील भामोदनजीक शहानूर नदीपात्रात आढळून आल्याने शंका-कुशंका व्यक्त केली जात आहे.
संबंधितांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रम प्रवर्तन अधिकारी अमित नेहरा (वय ३३) २१ सप्टेंबरला कार्यालयीन दाैऱ्यावर गेले होते. २८ ला महत्त्वाची कॉन्फरन्स असल्याने नेहरा २७ सप्टेंबरला त्यांच्या मारुती रिटज् कारने (एचआर ७७ - ७२०५) जळगाव येथून नागपूरकडे निघाले. त्यानंतर त्यांचा काही पत्ता नाही. २८ सप्टेंबरच्या कॉन्फरन्समध्ये ते सहभागी न झाल्याने कार्यालयीन वरिष्ठांकडून त्यांच्याबाबतची चाैकशी सुरू करण्यात आली. त्यानंतर २७ सप्टेंबरच्या रात्री ७ वाजतापासून त्यांचा फोनही स्विच्ड ऑफ असल्याचे पुढे आले.
भामोद येथील काही शेतकऱ्यांना दर्यापूर ते दहिहांडा मार्गावरील शहानूर नदीपात्रात उलटलेल्या कारची चाके गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास दिसली. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. येवद्याचे ठाणेदार अमूल बच्छाव तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला घटनेची माहिती दिली.
दुपारी २ वाजता दरम्यान जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्वप्रथम दोर व ट्रॅक्टरच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, नदीच्या वेगवान प्रवाहामुळे ती बाहेर निघू शकली नाही. जिल्हा शोध व बचाव पथकाला कारमध्ये एकमेव चालक असल्याचे निदर्शनास येताच त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने बाहेर काढण्यास विलंब होत होता. अखेर कार बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली. ही कार सोमवारी रात्री ११ च्या सुमारास पात्रात उलटली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
कार्यालय अधीक्षकांनी दिली होती मिसिंग कम्प्लेंट’
नागपूरच्या कार्यालय अधीक्षकांनी गुरुवारी दुपारी गिट्टी खदान पोलीस ठाण्यात ‘मिसिंग कम्प्लेंट’ दिली. अधिकाऱ्याचे रहस्यमयरीत्या बेपत्ता होणे आणि त्यांची कार पुरात वाहून गेलेली आढळणे या दोन बाबी अमरावती ग्रामीण आणि नागपूर पोलिसांशी कनेक्ट आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे वरिष्ठ या संबंधाने एकमेकांच्या संपर्कात आहेत. कार्यालयीन वरिष्ठांकडून अमित नेहरा यांच्या नातेवाइकांना माहिती कळविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे बंधू हरियाणातून नागपूरकडे निघाले आहे.
घटनास्थळी तहसीलदार योगेश देशमुख, ठाणेदार अमूल बच्छाव, राज्य राखीव पोलीस बल समादेशक हर्ष पोदार यांच्या आदेशाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, पोलीस निरीक्षक मारुती नेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शोध व बचाव पथकाचे देवानंद भुजाडे, कौस्तुभ वैद्य, भूषण वैद्य, सचिन धमरकर, गजानन वाडेकर, हिरालाल पवार, पंकज येवले, महेश मांदाळे, अजय आसोले उपस्थित आहेत.
क्रेनने नदीपात्रातून काढली कार
सायंकाळी पाच वाजता क्रेन बोलावून कार नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली व त्यानंतर सरळ करण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर लॉक झालेल्या या कारची दारे उघडण्याची कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येत होती. कार बुडाल्याची वार्ता कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. भामोद फाट्यावरून २०० मीटर अंतरावर हे घटनास्थळ आहे.