नागपूर : तीन दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेहच पारडी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या रेल्वे क्रॉसिंगजवळील खड्ड्यातील पाण्यात तरंगताना आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.
संचिता प्रमोद पाटील (वय १५, रा. आराधनानगर, बिडगाव) असे मृतदेह आढळलेल्या मुलीचे नाव आहे. पारडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती दहावीला शिकत होती. संचिता मंगळवार २१ नोव्हेंबरला रात्री १२:३० वाजता घरी न दिसल्यामुळे नातेवाइकांनी तिचा शोध घेतला. परंतु, ती कोठेच आढळली नाही. अखेर नातेवाइकांनी वाठोडा पोलिस ठाण्यात कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी १०:४५ वाजेच्या पूर्वी तिचा मृतदेह पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागेश्वरनगर रेल्वे क्रॉसिंग जवळील खड्ड्यातील पाण्यात तरंगताना दिसला. पोलिसांनी तिचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी प्रमोद दर्याव पाटील (वय ३९) यांनी दिलेल्या सूचनेवरून पारडी पोलिस ठाण्याचे प्रल्हाद उईके यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अंकिता पाण्याच्या खड्ड्यात पडली की तिचा घातपात करण्यात आला याचा शोध पारडी पोलिस घेत आहेत.
मोबाइलही ठेवला होता बंद करून
मंगळवारी रात्री १२:३० वाजता घराबाहेर पडताना संचिता सोबत मोबाइल घेऊन गेली होती. परंतु, तिने मोबाइल बंद करून ठेवला होता. संचिताच्या कुटुंबात तिचे आई-वडील आणि लहान भाऊ आहे. तिचे वडील पेंटिंगचे काम करतात. बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेहच सापडल्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.