नागपूर : रविवार सकाळपासून बेपत्ता असलेल्या सात वर्षीय मुलाचा अखेर सोनेगाव तलावात मृतदेह सापडला. या घटनेमुळे सहकारनगर भागात खळबळ उडाली आहे. मुलगा सोनेगाव तलावात खेळताना पडला की, त्यामागे आणखी काही कारण आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत.
साहिल रामप्रसाद राऊत (७) असे मृतक मुलाचे नाव आहे. तो पहिल्या इयत्तेत होता. तो आई-वडील व मोठ्या बहिणीसोबत सहकारनगरमधील हनुमान मंदिराशेजारी असलेल्या वस्तीमध्ये राहत होता. त्याचे वडील मिस्त्री असून आई धुणीभांड्याची कामे करते. रविवारी सकाळी साहील त्याच्या मित्रांसह घरातून खेळण्यासाठी बाहेर पडला. तो दुपारपर्यंत आला नसल्याने बहिणीने पालकांना माहिती दिली.
पालकांनी परिसरात शोधाशोध केली. त्यानंतर मित्रांच्या घरी जाऊनदेखील विचारणा केली. मात्र, तो कुठेच आढळला नाही. त्यानंतर रात्रीच्या सुमारास सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, तो कुठेच आढळला नाही. त्यानंतर रात्रीच्या सुमारास सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी शोधण्याची तसदीच घेतली नाही
रात्र असल्याने पोलिसांनी त्याला शोधण्याची जास्त तसदी घेतली नाही. रात्री राऊत व त्यांचे नातेवाईक तसेच परिसरातील मित्र शोधाशोध करत होते. सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सोनेगाव तलावात एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस तेथे पोहोचले असता तो साहिलचा असल्याचे स्पष्ट झाले. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी मेडिकलकडे रवाना केला व अकस्मात मृत्यूची नोंद केली.
रात्रभर शोधाशोध
साहिल बेपत्ता झाल्यानंतर सायंकाळपासून पालकांनी त्याचा शोध सुरू केला होता. दूर राहणारे मित्रदेखील पोहोचले होते. अगदी त्याची आई ज्या लोकांकडे काम करायची त्यांनी सोशल माध्यमांवरदेखील साहिल बेपत्ता असल्याची माहिती पाठविली. सकाळीदेखील परिसरात त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, अखेर त्याचा मृतदेहच आढळला.
मृत्यू नेमका कशामुळे?
साहिलचे आई-वडील कामावर जायचे व त्यामुळे तो अनेकदा मित्रांसोबत बाहेर खेळायचा जायचा. त्याच्या घरापासून सोनेगाव तलाव हा अर्ध्या किलोमीटर अंतराच्या आतच आहे. त्याच्या मित्रांसोबत तो सोनेगाव तलावावर खेळायला गेला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. आता त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची पोलिस चौकशी करत आहेत.
सोनेगाव तलावाजवळ सुरक्षाच नाही
सोनेगाव तलावाच्या काठावर कुठेही सुरक्षेची व्यवस्था नाही. या तलावाला लागूनच वर्दळीचा रस्ता असून, किनाऱ्यावर अनेकदा लहान मुले खेळत असतात. मात्र, तेथे सुरक्षारक्षक किंवा इतर व्यवस्था नसल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती नेहमीच व्यक्त करण्यात येते. सोनेगाव तलावाच्या बाजाराकडील भागातील झाडांच्या परिसरात दिवसभर रिकामटेकडे तरुण बसले असतात व तेथे जुगारदेखील चालतो. मात्र, तेथेदेखील कुठलीही कारवाई होत नाही.