वसीम कुरैशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावत्या रेल्वेत प्रवासी असो वा आरपीएफ जवान, आता त्यांच्या गैरवर्तणुकीची माहिती कॅमेऱ्यात कैद होेणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) ट्रेन स्कॉटिंगमध्ये बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचा उपयोग करीत आहेत. या कॅमेऱ्यांमुळे सुरक्षा जवान आणि प्रवाशांमध्ये होणाऱ्या संवादासह त्यांच्यातर्फे होणाऱ्या गैरवर्तणुकीची माहिती प्राप्त होणार आहे. अशा प्रकारचा प्रयोग नागपूर मंडळात पहिल्यांदा होत आहे.रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये सर्व घटना कैद होतात. पण धावत्या रेल्वेत दोन्ही पक्षांतर्फे होणाऱ्या गैरवर्तणुकीच्या आरोपानंतर खरे कोण बोलत आहेत, या निकर्ष काढणे कठीण असते. परंतु आता जवानांच्या कॉलरवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात सर्व घटना कैद होत आहेत. २६ जानेवारीला आरपीएफला १० कॅमेरे मिळाले असून रेल्वेत तैनात जवानांना वितरित करण्यात आले आहेत. रेल्वेत बॉडी वॉर्न कॅमेऱ्याचा प्रयोग पश्चिम रेल्वे व राजकोट मंडळात झाला आहे. नागपुरात दपूम रेल्वे मंडळ आरपीएफने पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू केला आहे. कॅमेरा जवळपास ५ सेंटीमीटर लांब असून बॅटरीवर चालणारा आहे. एकदा चार्ज केल्यानंतर १० तासांपर्यंत सुरू असतो. त्यातील रेकॉर्डिंग ३० दिवसांपर्यंत सुरक्षित ठेवता येते. आरोपानंतर कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग पाहून आणि ऐकून संबंधित प्रवासी आणि जवानांवर कारवाई करण्यात येईल.
पारदर्शकता आणण्याचा उद्देशट्रेन स्कॉटिंगमध्ये सहभागी सर्व जवानांच्या कॉलरवर लागलेल्या या कॅमेऱ्यामुळे कामात पारदर्शकता येणार आहे. धावत्या रेल्वेत कोण, कुणासोबत कसे वागत आहेत, याचा शोध घेणे सोपे होणार आहे. यामुळे आरपीएफ जवानांच्या कार्यप्रणालीवर देखरेख ठेवता येईल. सध्या या कॅमेऱ्याचा उपयोग मंडळांतर्गत नागपूर ते दुर्ग या दरम्यानच्या काही रेल्वेमध्ये करण्यात येत आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर याचा उपयोग सुरू आहे. चांगले परिणाम दिसून आल्यानंतर कॅमेऱ्यांची संख्या आणखी वाढविण्यात येईल.आशुतोष पांडे, वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त (आरपीएफ), दपूमरे, नागपूर.