लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका युवकाचा मृतदेह त्याचा घरी संशयास्पद अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना न्यू सुभेदार नगर येथे उघडकीस आली. कपिल नासिरकर असे मृत युवकाचे नाव आहे.पोलीस सूत्रानुसार मृत कपिल हा काही दिवसांपूर्वीच पत्नी प्रिया आणि मुलगी रिद्धीसोबत नागपूरला राहायला आला होता. येथे तो एका पेट्रोेल पंपावर काम करायचा. तो नेहमीच रात्रपाळीत काम करीत होता. पत्नी प्रिया एका खासगी संस्थेत नोकरी करते. मुलीच्या देखभालीसाठी तिला आपल्या आईच्या घरी सोडत असे. मंगळवारी प्रिया सकाळीच नोकरीवर निघून गेली. रोज ती आपल्या आईकडे असलेल्या मुलीला घेऊन सायंकाळी घरी परत येत असे. मंगळवारी ती मुलीला आणण्यासाठी आईकडे गेली. परंतु प्रकृती बरी नसल्याने ती तेथेच थांबली. बुधवारी प्रिया मुलीला घेऊन घरी आली. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. कपिल आत झोपला असेल असे तिला वाटले. परंतु खूप उशिरापर्यंत दरवाजा न उघडल्याने तिने घर मालकाला मदतीसाठी बोलाविले. दोघांनी मागच्या दरवाजातून आत प्रवेश केला. तेव्हा कपिलला मृतावस्थेत पाहून तिला धक्काच बसला.मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कपिलने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्याजवळ नॉयलॉनची दोरीही सापडली आहे. परंतु सूत्रानुसार त्याचा मृतदेह बिछान्यावर रक्ताने माखलेला पडला होता. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमाही दिसून येत होत्या. घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे पोलीस या प्रकरणाच्या तपासासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेणार असल्याचे सांगितले जाते.रस्त्यावरील अपघातात एकाचा मृत्यूएका टिप्परने बाईकला धडक दिली. यात बाईकवर बसलेल्या दोनपैकी एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवारी दुपारी हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील कान्होलीबारा जवळ घडली.पोलीस सूत्रानुसार बुधवारी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान हिंगणा येथील रहिवासी अंकुश रामाजी बुधबावरे (४२) व महेंद्र शंकरराव बुरले (४५) बाईक क्रमांक एमएच/४०/बीएन/७६४१ ने सिलेंडर घेऊन जात होते. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या टिप्परने बाईकला धडक दिली. यात दोघेही खाली पडले. महेंद्रचा घटनास्थळीच मृत्यू झाला.आरोपी टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोघांनी लावली फाशीशहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ नोव्हेंबर रोजी दोघांनी फाशी लावून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना मंगळवारी सकाळी ८.४५ वाजता बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. रेवतीनगर, बेसा येथील मोहिनी रोशन वेरुळकर (२६) यांनी फाशी घेतली. दुसरी घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौशल्यानगर येथे घडली. गणेश अशोक सहारे (३६) याने आपल्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.