लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुंबईहून मोठे विमान बोईंग-७४७ नागपुरात पोहचले. ४०० पेक्षा जास्त प्रवासी क्षमता असलेल्या एअर इंडियाच्या या विमानात मुंबईहून कंपनीचे १२ वैमानिक आले. यामध्ये १० वैमानिक प्रशिक्षणार्थी होते. या मोठ्या विमानाने शहराच्या काही भागात उड्डाण भरल्याने लोकांमध्ये कुतूहलाचा विषय बनला होता.मुंबई विमानतळावर सर्वाधिक विमानांची ये-जा असल्याने येथे विमानांचे प्रशिक्षण शक्य नाही. तर नागपुरात कमी उड्डाणे आणि हवामान चांगले असल्याने अशा उड्डाणांसाठी अनुकूल वातावरण उपलब्ध असते. सकाळी ९ ते दुपारी जवळपास १ वाजेपर्यंत वैमानिकांनी प्रशिक्षण पूर्ण केले. लॉकडाऊनदरम्यान अनेक वैमानिक आपल्या परवान्याचे नूतनीकरण करू शकले नव्हते. त्याकरिता प्रशिक्षण आवश्यक होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान रविवारीही नागपुरात येणार असून प्रशिक्षण विमान म्हणून आकाशात घिरट्या घालणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोर्इंग-७४७ पूर्वीही आले आहे. या विमानाचा उपयोग साधारणत: हजयात्रेदरम्यान करण्यात येतो.
नागपूरच्या आकाशात बोईंग-७४७ ने घातल्या घिरट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 9:32 PM