आशिष दुबे
नागपूर : स्वत: सैन्यातील मोठा अधिकारी असल्याचे सांगून सैन्यात भरती करून देण्याच्या नावाखाली युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मिल्ट्री इंटेलिजन्स पुणे यांनी भंडाफोड केला आहे. या टोळीच्या म्होरक्याला उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून अटक केली. या टोळीचे जाळे देशभर पसरले आहे. टोळीतील सदस्य सैन्यात भरती करून देण्याच्या नावाखाली ग्रामीण भागातील युवकांची फसवणूक करतात.
‘लोकमत’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीचा म्होरक्या व अन्य दोन आरोपी हाती लागल्यानंतर नागपूर, पुणे व औरंगाबाद मिल्ट्री इंटेलिजन्सने धाडी घातल्या. मात्र, धाडीत काय आढळून आले, याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, टोळीचा पर्दाफाश झाल्याने देशभरात अनेकांना अटक होण्याची शक्यता आहे. तसेच एका मोठ्या नेटवर्कचा भंडाफोड होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मिल्ट्री इंटेलिजन्स अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.
सूत्रांच्या माहितीनुसार, संदीप शर्मा हा या टोळीचा म्होरक्या आहे. तो सैन्याच्या एका तुकडीत कार्यरत होता. वर्ष २०१८ मध्ये तो बेपत्ता झाला. सैन्याने त्याला फरार घोषित केले होते. कारवाईदरम्यान आरोपीकडे अनेक नियुक्तीपत्र व शिक्के आढळून आले. त्याशिवाय नागपूर येथील अनुरक्षण कमान मुख्यालयातून संबंधित दस्तावेज हस्तगत करण्यात आले. याची तपासणी सुरू आहे. टोळीचा भंडाफोड होताच तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. टोळीची संंबंधित लोकांची धरपकड सुरू आहे. या टोळीविरोधात पुणे येथील खडकी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा झाला भंडाफोड
पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, टोळीतील एक सदस्य हिदायतुल्ला गुलाब मुनेर नामक व्यक्तीने स्वत: १०९ टीए बटालियन कोल्हापूर सैन्य कॅम्पमध्ये कार्यरत असल्याची माहिती देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कलंबा येथील रहिवासी विशाल शिवानंद शिंदे याला मिल्ट्री इंजिनिअर सर्व्हिसेसमध्ये भरती करून देण्याची भूलथाप दिली. त्याचे रवी नामक व्यक्तीशी बोलणे करून दिले. रवीने त्याच्याकडे ६ लाख रुपयांची मागणी केली. तसेच शैक्षणिक दस्तावेज मागितले.
युवकाने कुुटुंबातील सदस्यांची चर्चा करून दस्तावेज व ६० हजार रुपये रवी याला ऑनलाइन पाठविले. त्यानंतर रवी नावाच्या युवकाने त्याला कमांड हॉस्पिटल पुणे येथे मेडिकलसाठी बोलावले. त्यानंतर दोपोरी रोड पुणे येथे आयकार्ड व सर्व्हिस बुक घेण्यासाठी बोलावले. तेथे रवी याच्याकडे आणखी काही युवक दस्तावेज घेण्यासाठी आले होते. रवी नावाच्या युवकाने त्यांना एमईएस, शिक्का असलेले ओळखपत्र व सर्व्हिस बुक दिले. उर्वरित रक्कम २१ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता खडकी एम्युनिशन फॅक्ट्रीजवळ बोलावले. तेथे संदीप शर्मा यांच्याशी भेट झाली. यादरम्यान मिल्ट्री इंटेलिजन्सने त्याला अटक केली.