लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत वृक्ष लागवडीत जे मजूर कामावर गेले नव्हते, त्या मजुरांची नावे हजेरीपटावर दाखवून त्यांच्या खात्यावर चुकीच्या पद्धतीने आर्थिक व्यवहार केल्या गेले. याप्रकरणी उमरेड तालुक्यातील सोनपुरी, सालई आणि निरव्हा येथील रोजगार सेवकावर दंडात्मक कारवाईचे आदेश जारी करण्यात आले. योगेश बंडूजी ठाकरे असे या रोजगार सेवकाचे नाव असून, मनरेगाच्या कामात बोगस हजेरी लावणे या सेवकाला चांगलेच महागात पडले आहे.
तत्कालीन जिल्हा तक्रार निवारण प्राधिकारी पी. एस. मेश्राम यांनी सदर प्रकरणाचा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवावा व योगेश ठाकरे यांच्याकडून बोगस मजुरांची मजुरी ५०,५२० रुपये वसूल करावे तसेच त्यांना रोजगार सेवक पदावरून काढून नव्याने रोजगार सेवकाची नियुक्ती करावी, असे आदेश निर्गमित केले आहेत.
सोनपुरी येथील राहुल भगवान तागडे या तरुणाने या गैरव्यवहाराची ६ मे २०१७ रोजी तक्रार केली होती. तब्बल तीन वर्षाच्या सखोल चौकशीअंती २६ मे २०२० ला जिल्हा तक्रार निवारण प्राधिकारी यांनी हे आदेश निर्गमित केले. सोबतच या आदेशाची प्रत मुंबई मंत्रालयासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडेही पाठविली. त्यानंतर उमरेड पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी जयसिंग जाधव यांच्याकडेही सदर प्रकरणाचा आदेश धडकला.
सुमारे नऊ महिन्यांपूर्वी निघालेल्या या आदेशावर अद्याप कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलण्यात आले नाही. जाधव यांनी याप्रकरणी कारवाई का केली नाही, असा सवाल तक्रारकर्ते राहुल तागडे यांनी विचारला आहे. चौकशीला तीन वर्षे आणि कारवाईला पुन्हा तीन वर्षे लावणार काय, असा सवाल करीत त्यांनी याप्रकरणी शंकाकुशंका व्यक्त केल्या आहेत. जाधव यांनी जिल्हा तक्रार निवारण अधिकारी तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपलीच दाखविली, असा आरोपही राहुल तागडे यांचा आहे. तातडीने कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.
....
लग्नाच्या दिवशी हजेरी
उमरेड तालुक्यातील सोनपुरी या गावातील मनरेगाच्या वृक्ष लागवडीच्या कामावर रोजगारांना त्यांच्या घरी लग्न असतानासुद्धा मंडपपूजन आणि लग्नाच्या दिवशी कामावर उपस्थिती दर्शविली आहे. विशेषत: वर मुलाचीही बोगस हजेरी लावल्याचीही बाब चौकशीत उजेडात आली आहे. याव्यतिरिक्त अन्य बोगस मजुरी लावून रोजगार सेवक योगेश ठाकरे याने हजारो रुपयांचा चुना लावला. तब्बल ८१६ दिवसांची बोगस हजेरी दाखविल्याचेही चौकशीत उघडकीस आले आहे.
.....
यांच्यावरही ठपका
सोनपुरी येथील मनरेगाच्या योजनेच्या कामात झालेल्या गैरव्यवहारात ग्रामसेवक पी.व्ही. बोराडे यांनीसुद्धा दुर्लक्ष केल्याने यानंतर अशी चूक होणार नाही, अशी ताकीद देण्यात आली. उमरेड पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी गिरीश मोटघरे यांनीसुद्धा रोजगार सेवकाशी संगनमत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मोटघरे यांना कामावरून कमी करावे व नवीन तांत्रिक अधिकारी नियुक्त करावे, असेही आदेशात नमूद आहे. मोटघरे यांच्यासह किशोर गिरडे, कुमार टुले यांनाही सक्त ताकीद देण्यात आली आहे.
...
सोनपुरी येथील मनरेगाअंतर्गत वृक्ष लागवडीच्या गैरव्यवहार प्रकरणाच्या कारवाईचे आदेश मिळाले आहेत. कोराेनामुळे कारवाई होऊ शकली नाही. तातडीने कारवाई करेल.
- जयसिंग जाधव, खंडविकास अधिकारी, पंचायत समिती, उमरेड