लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात अटकेपासून वाचण्यासाठी बोगस कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट देणारा बीपीटी ट्रॅव्हल्सचा संचालक सिराज शेख याने केवळ एक हजार रुपयात कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळविला होता. या रिपोर्टसाठीच सिराज आठवडाभरापासून पोलिसांची दिशाभूल करीत होता. परंतु हा बोगस रिपोर्टच त्याला तुरुंगात जाण्याचे कारण ठरला. दरम्यान, गणेशपेठ पोलिसांनी सिराज व त्याच्या साथीदारांची पोलीस कोठडी पुन्हा एक दिवसासाठी वाढवली.
गुन्हे शाखेने १८ एप्रिल रोजी गणेशपेठ येथील एसटी स्टॅण्ड जवळील राहुल रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये आयपीएल सट्टेबाजीचा अड्डा चालवणाऱ्या विशाल कालेश्वरे आणि चंदन राठोडला अटक केली होती. त्यांचा मुख्य सूत्रधार मोमीनपुरा येथील अशफाक अंसारी फरार झाला होता. तपासात पोलिसांना यात सिराजही सहभागी असल्याची माहिती मिळाली. पोलीस आठवडाभरापासून सिराजचा शोध घेत होते. परंतु तो पोलिसांच्या हाती लागला नाही. नागपुरात आल्यावरही त्याने स्वत:लाा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगत पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न केला. सिराजचा पुतण्या अल्ताफ शेख याने काही दिवसांपूर्वी त्याचा मित्र जावेदच्या माध्यमातून प्रयोगशाळा कर्मचारी गजानन पोहरकर याच्या माध्यमातून बोगस कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळविला होता. सिराजने अल्ताफला आपल्यासाठीही बोगस रिपोर्टची व्यवस्था करायला लावली. अल्ताफने जावेदच्या माध्यमातून गजाननशी चर्चा केली. गजाननने केवळ एक हजार रुपयात बोगस रिपोर्ट देण्याची तयारी दर्शविली. त्याने प्रयोगशाळेच्या संचालक दाम्पत्यांनासुद्धा ही बाब कळू दिली नाही. त्याने सांगितले की, प्रयोगशााळेच्या संचालिका त्याच्यावर खूप विश्वास करतात. त्यामुळे तो सहजपणे हे काम करून देईल.
आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात अटक झाल्यानंतर जामीन दिल्यानंतर कोविड पॉझिटिव्ह असल्याने पोलिसांनी सिराजला पाचपावली क्वारंटाईन सेंटरमध्ये नेले. तिथे कोविड तपासणी केल्यावर सिराज निगेटिव्ह असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी सिराजचा बोगसपणा उघडकीस आणला. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सिराज शेख, त्याचा पुतण्या अल्ताफ शेख आणि गजानन पोहरकर याला अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात सादर करून एक दिवसाची पोलीस कोठडी मिळविली होती. तपास अधिकारी पीआय भारत क्षीरसागर यांनी रविवारी पुन्हा न्यायालयासमाेर सादर करून एक दिवसाची कोठडी वाढवून घेतली.