लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्रकार असल्याचे सांगून हॉटेल मॅनेजरकडून खंडणी वसूल करणाऱ्या युवकाला रंगे हाथ पकडण्यात आले.ही घटना सदर पोलीस ठाणे अंतर्गत घडली. मो. आरीफ खान (३७) सूरजनगर मानकापूर असे आरोपीचे नाव आहे. तो एका वर्तमानपत्राचा पत्रकार असल्याचे सांगतो. तो मंगळवारी रात्री सदर येथील रेसिडेन्सी मार्गावरील हॉटेल चील अॅण्ड ग्रिलमध्ये आला. त्याने हॉटेलच्या मॅनेजर हेमंत वासवानी याला जाहिरातीचे थकीत पाच हजार रुपये मागितले. रुपये न दिल्यास रेस्टॉरंट बंद करून हॉटेल संचालकाचे जगणे कठीण करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी दिली. या घटनेमुळे हॉटेलमध्ये खळबळ उडाली. हेमंतने आरडाओरड केल्यावर लोक जमा झाले. त्यांनी आरीफला पकडले. दरम्यान सदर पोलीसही घटनास्थळी आले. पोलिसांनी आरीफला ताब्यात घेतले.पोलीस सूत्रानुसार आरीफच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा डॉक्टर, हॉटेल संचालक आणि इतर काही लोकानी खंडणी वसूल केल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देऊन तो पैशाची मागणी करीत होता. पोलिसांनी विचारपूस केल्यास नेत्यांचा धाक दाखवून तक्रारकर्ते व पोलिसांना शांत करीत होता. अपवादात्मक प्रकरणातच त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला जात असे. तो स्वत:ला पत्रकारासोबतच मानव अधिकार संघटनेचा पदाधिकारी असल्याचेसुद्धा सांगतो. नेते आणि अधिकाºयांसोबत काढलेले फोटो दाखवून वसुली करतो. पोलिसांच्या हाती लागल्यावरही आरीफच्या वर्तनात कुठलाही बदल आलेला नाही. तो पोलिसांनाच पाहून घेण्याची धमकी देऊ लागला. त्याला मारहाण करून मानवी अधिकारांचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊ लागला. त्याच्या धमकीमुळे पोलीसही चक्रावले आहेत. तो पकडल्या गेल्यावर अनेक पीडितांनी ठाण्यात येऊन आपली व्यथा पोलिसांना सांगितली. आरीफ मूळचा अकोला येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.पत्रकारितेशी कुठलाही संबंध नाहीमिळालेल्या माहितीनुसार आरीफचा पत्रकारिता किंवा मीडियाशी कुठलाही संबंध नाही. तो जाहिराती देण्याच्या नावावर रुपये मागत होता. वरिष्ठ पोलिसांनीसुद्धा ठाण्यात जाऊन त्याची विचारपूस केली. बुधवारी त्याला न्यायालयात सादर केले असता त्याने पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केली. न्यायालयाने सिव्हिल सर्जनकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले. तपासणीनंतर त्याला तुरुंगात पाठविण्यात आले. पोलीस गुरुवारी त्याला पुन्हा न्यायालयात सादर करणार आहे.
नागपुरात खंडणी वसूल करताना सापडला बोगस पत्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 9:33 PM
पत्रकार असल्याचे सांगून हॉटेल मॅनेजरकडून खंडणी वसूल करणाऱ्या युवकाला रंगे हाथ पकडण्यात आले. ही घटना सदर पोलीस ठाणे अंतर्गत घडली.
ठळक मुद्देहॉटल मॅनेजरला मागितली खंडणी : सदर पोलिसांची कारवाई