नागपूर : मोबाइल आणि इंटरनेटच्या वाढत्या उपयोगासह आता सायबर क्राइमचा टप्पा वाढत आहे. याच कारणांनी मोबाइल ओटीपी, लिंकच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार बँकांमधून लोकांची रक्कम लंपास करीत आहेत. याच श्रृंखलेत सध्या भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) नावाने मोबाइलधारकांच्या व्हॉट्सअॅपवर बोगस मेसेज पाठविण्यात येत आहेत. या माध्यमातून त्यांची फसवणूक करण्यात येत आहे.
प्रिय ग्राहक तुमचे बीएसएनएल सिम आज एक्स्पायर होत असून, कृपया कस्टमर केअर क्रमांकावर २४ तासांच्या आत संपर्क साधावा, असे ग्राहकांना पाठविण्यात येणाऱ्या मेसेजमध्ये लिहिले आहे. या मेसेजची शहानिशा करण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने मेसेजवर दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता तो मोबाइल पश्चिम बंगालचा होता. मोबाइल क्रमांक व्यस्त असल्याने बंगाली भाषेत संदेश येत होता. त्यानंतर प्रतिनिधीने ज्या मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सअॅप मेसेज आला होता, त्यावर कॉल केला तेव्हा एका व्यक्तीने संवाद साधला. तुम्ही कुठून बोलता, असे प्रतिनिधीने विचारले असता तो उत्तर देण्यास टाळाटाळ करू लागला. यावरून स्पष्ट होते की, सिम एक्स्पायर होत असल्याचा आलेला मेसेज बोगस होता.
यासंदर्भात बीएसएनएलचे जनसंपर्क अधिकारी समीर खरे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, अशा प्रकारचे बोगस मेसेज बीएसएनएलच्या ग्राहकांना पाठविण्यात येत आहेत. ग्राहकांनी या मेसेजबाबत सतर्क राहावे. बीएसएनएल असे कोणतेही मेसेज ग्राहकांना पाठवित नाही. विभाग मेसेज पाठविणाऱ्यांचा शोध घेत आहे.