आशिष दुबे
नागपूर : अनेक महिन्यांपासून भारतीय सैन्याचा जवान असल्याची बजावणी करणाऱ्या एका व्यक्तीला सैन्यदलाच्या गुप्तचर खात्याने (एमआय) ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून नाशिकमध्ये राहणाऱ्या एका सैनिकाचे ओळखपत्र सापडले आले. या प्रकरणाची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. चौकशी सुरू असल्याचे कारण देत अद्यापपर्यंत या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
या प्रकरणाबाबत सैन्यदल व पोलिसांकडून गोपनीयता बाळगण्यात येत आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी करण्याचे प्रकरण ताजेच आहे. या स्थितीत सैन्याने हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीने डिफेन्सच्या कार्यक्षेत्राची रेकी किंवा काही गुप्त माहिती तर गोळा केली नाही ना या दिशेने एमआयकडून तपास सुरू आहे. संबंधित व्यक्ती ९ डिसेंबर रोजी अंबाझरी येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना पडल्या गेल्या. सुरक्षा रक्षकांना त्याला प्रवेशद्वारावर थांबवत प्रतिबंधित जागेत प्रवेश देण्यास नकार दिला. या व्यक्तीने ओळखपत्र दाखवीत मी सैन्याचा जवान असल्याचे सांगितले. परंतु, सुरक्षारक्षकांना त्याच्यावर संशय आला व त्याला चौकशीसाठी थांबविण्यात आले. याची माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील देण्यात आली. सैन्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यालादेखील दिली. सोबतच एमआयने तोतया सैनिकाला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली. चौकशी पूर्ण झाल्यावर त्याच्याविरोधात पुढील कारवाई निश्चित करण्यात येईल. या संबंधात एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांना संपर्क केला असता त्यांनी यावर कुठलीही माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यास सांगितले.
टॅक्सीचालक असल्याचा दावा
एमआयच्या चौकशीत तोतया सैनिकाने तो टॅक्सीचालक असल्याचे सांगितले आहे. तसेच तो हिंगण्यातील रहिवासी असल्याचा दावा त्याने केला आहे. टॅक्सीतच हे ओळखपत्र मिळाले. त्याचा उपयोग केवळ टोलनाक्यांवर करायचा. अमरावती मार्गाहून हिंगण्यासाठी एक शॉर्टकट आहे. त्यामुळे त्याने ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रवेश केला, असे त्याने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या जवानाचे ओळखपत्र हरविले होते, त्याने पोलीस तक्रार केली होती. त्याच्याविरोधात नियमांनुसार सैन्याने कारवाई केली आहे.