काँग्रेसचे विभागीय आयुक्तांना निवेदन : संबंधितावर गुन्हे नोंदवा नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मतदार यादीत नावांचा समावेश असलेल्या साडेचार हजाराहून अधिक मतदारांची नागपूर महापालिकेच्या अंबाझरी प्रभागाच्या मतदार यादीत बोगस नोंद करण्यात आली आहे. यासाठी वीज बिल व शाळेचे बोगस दाखले सादर करण्यात आलेले आहेत. तसेच नगरसेवक परिणय फुके यांनी या मतदारांना खोटे रहिवासी प्रमाणपत्र देऊ न नावनोंदणीसाठी शिफारस केली होती. या मतदारांनी महापालिके च्या २०१२ च्या निवडणुकीत मतदान करून शासनाची फसवणूक के ली असल्याने संबंधितावर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने बुधवारी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. भाजपचे पदाधिकारी व २०१२ च्या निवडणुकीतील अंबाझरी प्रभागातील भाजपचे उमेदवार घनश्याम चौधरी यांनी बोगस मतदारांची माहिती दिली. या प्रकरणात बोगस मतदारांसह तत्कालीन निवडणूक अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात निवडणूक कायद्यानुसार पोलिसात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावेळी विकास ठाकरे यांच्यासह उमाकांत अग्निहोत्री, संदेश सिंगलकर, संजय सरायकर व शिवसेनेचे भाऊ वाघाडे आदी उपस्थित होते. गेल्या निवडणुकीत अंबाझरी प्रभागात फुके यांना ४,५०० मते मिळाली होती. बोगस मतदान करताना काहींना रंगेहात पकडण्यात आले होते. परंतु तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न करता सोडून दिले होते.(प्रतिनिधी) ठाकरे व चौधरी यांचे आरोप राजकीय हेतूने २०१४ मध्ये महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर घनश्याम चौधरी यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. प्रकरण न्यायालयात असताना अशी मागणी करता येते का, हा प्रश्न आहे. मतदारांना नाव नोंदणीसाठी मी शिफारस पत्रे दिलेली नाही. नगरसेवक नागरिकांना ओळखपत्रे देतात. त्यांनी त्याचा दुरुपयोग केला असेल तर त्याला मी जबाबदार नाही. चौधरी यांनीच माझे बोगस लेटरहेड छापले असल्याची शंका आहे. आगामी निवडणुका विचारात घेता विकास ठाक रे व चौधरी यांनी राजकीय हेतूने आरोप केलेले आहेत. नागपूर शहरातील मतदार यादीत दोन लाखाहून अधिक मतदारांची नावे इतर ठिकाणच्या मतदार यादीत आहेत. यात उत्तर प्रदेशासह भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातील तसेच सावनेर, कळमेश्वर, नरखेड व इतर तालुक्यांतील मतदारांचा समावेश आहे. अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी निवडणूक विभागाने संबंधितांना नोटीस बजावलेल्या आहेत. -परिणय फुके, नगरसेवक
अंबाझरी प्रभागात बोगस मतदार
By admin | Published: July 28, 2016 2:41 AM