लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजनगर काटोल मार्गावर राहणारे प्रॉपर्टी डीलर आसिफ अब्दुल अजिज (वय ५१) यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५ लाख, ३९ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. शनिवारी रात्री १०.३०च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आसिफ अब्दुल अजिज आणि त्यांचे भाऊ प्रॉपर्टी डीलर आहेत. २२ फेब्रुवारीला ते सहपरिवार काश्मीरच्या सफरीवर गेले. त्यांचे वडील दुसऱ्या घरी राहतात. तेरोज सायंकाळी तिकडे येऊन बघायचे. शुक्रवारी सायंकाळी ५च्या सुमारास ते घराकडे येऊन गेले, तेव्हा दाराचे कुलूप-कोयंडा व्यवस्थित होता. शनिवारी सायंकाळी घराकडे आले, तेव्हा त्यांना दाराचा कुलूप-कोयंडा तुटलेला दिसला. दरम्यान, सफर आटोपल्याने शुक्रवारी रात्री आसिफही नागपुरात परतले. त्यांनी पाहणी केली असता, चोरट्यांनी घरातील साहित्याची फेकाफेक करून सोन्याचे दागिने लंपास केल्याचे लक्षात आले. त्यांनी सदर घटना पोलिसांना कळविली. ठाणेदार संतोष बाकल आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. ठसे तज्ज्ञांचे पथकही बोलवून घेण्यात आले.
---
सीसीटीव्हीत चोरटे कैद
माहिती कळताच एसीपी सुधीर नंदनवारही तेथे पोहोचले.आसिफ यांच्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी पहाटे ३ वाजेपर्यंत पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका ठिकाणच्या सीसीटीव्हीत संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली दिसत असून, तो धागा पकडून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे राजनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
----