लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकानेक वर्षांपासून विदर्भातील शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीनेच सोयाबीनची पेरणी आटोपती घेत आहे. अशातच अलीकडे बीबीएफ यंत्र पद्धतीने पेरते व्हा, याकडे कृषी विभाग गाव पिंजून काढत आहेत. अशातच आता सोयाबीन सरी वरंभावरती टोकन पद्धतीनेसुद्धा लागवड करण्याचा फॉम्युर्ला उमरेड तालुक्यातील काही शेतकरी करीत आहेत. या प्रयोगाकडे अनेकांचे लक्ष लागले असून कृषी अधिकारी, कर्मचारी आदींचा चमू या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून मार्गदर्शन करीत आहेत. उमरेड तालुक्यातील नवेगाव साधू, शिरपूर, डव्हा, खुसार्पार (उमरेड), हळदगाव, सिर्सी, चिचोली (रिठी), धुरखेडा, सरांडी आदी परिसरात या क्षेत्रातील हा अभिनव प्रयोग केला जात आहे.यंदा खरीप हंगामात यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी पुढाकार घेत हिंमत दाखविली आहे. साडेतीन फुटांच्या अंतरावर बेड पाडून बेडवर दुतर्फा सोयाबीन बियाणांची लागवड करणे, असे हे तंत्र असून साधारणत: ९ बाय ९ इंची अंतरावर बियाणांची लागवड केली जात आहे. शुक्रवारी नवेगाव साधू येथील शेतकरी संजय वाघमारे यांनी या प्रयोगाचा प्रारंभ आपल्या शेतात केला. या पद्धतीमध्ये मजूरवर्ग अधिक प्रमाणात लागत असला तरी बियाणांची चांगलीच बचत होते. बियाणांच्या दरात झालेली मोठी वाढ, शिवाय बियाणांचा तुटवडा यामुळे ही पद्धत आम्हा शेतक?्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास संजय वाघमारे, सतीश चकोले, सुनील पाटील, भोजराज दांदडे, गुलाब बोंडे, अमिताभ गायकवाड, सूरज गायकवाड, मनोरमा लांजेवार आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. बीजप्रक्रिया महत्त्वाची असून याकडेही आम्ही फारच गंभीरतेने लक्ष पुरवित आहोत, असेही शेतकरी म्हणाले.नागपूर जिल्ह्यातील एकूणच पर्जन्यमानाची आकडेवारी लक्षात घेतल्यास सोयाबीन पिकासाठी आवश्यकतेपेक्षा खूप अधिक प्रमाणात पाऊस होतो. यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होते आणि उत्पादनात घट होते. यामुळे या पद्धतीकडे आमचा कल असल्याचे मत संजय वाघमारे यांनी व्यक्त केले.एफआयआरची त्रिसूत्रीपेरणीपूर्व बीजप्रक्रियेकडे आता शेतकरी बहुतांश प्रमाणात लक्ष देत आहेत. बीजप्रक्रियेत 'एफआयआर' असा त्रिसूत्री फॉम्युर्ला लक्षात ठेवा, असे मत कृषी विभागाचे आहे. बीजप्रक्रिया करताना हा क्रम लक्षात ठेवणे आणि या क्रमानुसारच बीजप्रक्रिया करणे क्रमप्राप्त आहे. सुरुवातीला 'एफ' म्हणजे बुरशीनाशकाची प्रक्रिया (रोगनियंत्रण होते) त्यानंतर 'आय' म्हणजे रासायनिक कीटकनाशक (कीड नियंत्रण) आणि 'आर' म्हणजे जैविक जिवाणूंची प्रक्रिया (खताची बचत होते) योग्यरीत्या करणे आवश्यक आहे. ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वी झाल्यास रोग व किडींवर नियंत्रण राखले जाते. शिवाय उत्पादनातही वाढ होते, असे मत कृषी सहायक अरुण हारोडे यांनी व्यक्त केले.यंदा काही शेतकऱ्यांनी या पद्धतीने सोयाबीन लागवडीसाठी पाऊल उचलले आहे. योग्य अंतर राखल्यामुळे आणि पाण्याचा निचरा सुद्धा होणार असल्याने नक्कीच या पद्धतीमुळे उत्पन्नात वाढ होईल. ही पद्धत यंदा यशस्वी ठरल्यास पुढील हंगामात अधिक शेतकऱ्यांचा याकडे कल वाढेल.- संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, उमरेड