मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कलावंताची कल्पकता कुठून कशी बहरेल, याचा काही नेम नाही. अभय घुसे यांच्याबाबतीतही असेच काही घडले. सराफाच्या दुकानात साफसफाईचे काम करणाऱ्या अभयला मूर्तिकलेची अशी काही दृष्टी मिळाली की आज बॉलिवूड त्याच्या मूर्तीच्या प्रेमात आहे.कोराडी परिसरात राहणारे अभय घुसे अवघा नववा वर्ग शिकलेले आहेत. पूर्वी ते सराफा दुकानात साफसफईचे काम करायचे. त्या दुकानात अलंकार बनविण्याचे काम करायचे. हे काम त्यांनी शिकले. त्यानंतर एका कुटुंबाने त्यांना साईबाबांचा मुकुट बनविण्याचे काम दिले. ते काम इतके अप्रतिम झाले की त्यांना मुकुटाचे काम सातत्याने मिळू लागले. त्यांनी वर्धा रोडवरील साईबाबांच्या मूर्तीचे मुकुट बनविले. मुकुट बनविता बनविता त्यांनी मूर्ती सजावटीच्या कामाला सुरुवात केली आणि ही कला त्यांच्या हाताने चांगलीच बहरली. गेल्या १० ते १२ वर्षांपासून अभय आता पॉलिमर मार्बलमध्ये सर्व धर्मातील देवांच्या मूर्ती अतिशय आकर्षकपणे साकारत आहेत. गणपती, साईबाबा, श्रीकृष्ण, गौतम बुद्ध यांच्या आकर्षक मूर्ती सहज लक्ष वेधून घेत आहे. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी अभयला असा प्लॅटफॉर्म मिळवून दिला की त्याची कला बॉलिवूडपर्यंत पोहचली. लोकमतच्या एका कार्यक्रमात विजय दर्डा यांनी संधी दिल्याने अमिताभ बच्चन यांना अभयने मूर्ती भेट दिली. तेव्हापासून त्याच्या मूर्तीचा बॉलिवूड प्रवास सुरू झाला. सनी देओल, हेमा मालिनी, राज बब्बर, मधुर भांडारकर या बॉलिवूड तारकांसह अनेक मंत्र्यांकडे अभयने बनविलेल्या मूर्ती आहेत. विदेशातही त्यांच्या गौतम बुद्धांच्या मूर्ती गेलेल्या आहेत. पॉलिमर मार्बल, प्लायवूड, नारळाचे झाड व स्टोन्सचा वापर करून अतिशय देखणी मूर्ती ते साकारतात.
टेकडी गणपती माझे एटीएमअभय यांची टेकडी गणपतीवर अतिशय श्रद्धा आहे. टेकडी गणपतीच्या आकर्षक मूर्ती ते साकारतात. टेकडी गणपतीच्या मूर्ती घेऊन ते विक्रीस बाहेर पडल्यानंतर आजपर्यंत ते कधीच रिकाम्या खिशाने परतले नाही. शहरातील काही प्रसिद्ध इंटेरियर डेकोरेशनच्या शोरुममध्ये त्यांच्या मूर्ती उपलब्ध आहेत.
अमिताभ बच्चन त्यांच्या मूर्तीने झाले इम्प्रेसलोकमतद्वारे आयोजित यवतमाळच्या एका कार्यक्रमात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन दोघेही आले होते. या कार्यक्रमात विजय दर्डा यांनी अमिताभ बच्चन यांना मूर्ती भेट देण्यासाठी अभयला संधी दिली. अमिताभ बच्चन यांना मूर्ती भेट दिल्यानंतर ते चांगलेच आकर्षित झाले. त्यांनी अभय यांनी दिलेली मूर्ती घरी घेऊन गेले. गिरीश गांधी यांच्याकडूनही अभयला चांगलेच सहकार्य मिळाले.