मॉक ड्रीलनंतर बॉम्ब निकामी : विमानतळाच्या सुरक्षेवर शिक्कामोर्तबनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी दुपारी बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या वृत्ताने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पण हे वृत्त खोटे असून विमानतळावर मॉक ड्रील सुरू असल्याचे कळताच प्रवाशांनी नि:श्वास सोडला. अखेर बॉम्बशोधक पथकाने बॉम्बचा शोध घेऊन निकामी करण्याठी अन्य ठिकाणी नेला व विमानतळ सुरक्षित असल्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. प्राप्त माहितीनुसार, दुपारी १.३६ वाजता विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत एक फोन आला. विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. या घटनेची माहिती तात्काळ विमानतळाचे संचालन करणारी कंपनी मिहान इंडिया लिमिटेड व भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागाला देण्यात आली. बॉम्बशोधक पथक (बीडीडीएस) २० मिनिटात तर आयबी, इमिग्रेशन, कस्टम, एटीसी, विमानतळ कार्यान्वयन नियंत्रण केंद्र (एओसीसी), फायर, अॅम्ब्युलन्स आदींचे सर्व वरिष्ठ अधिकारी २० ते ३० मिनिटात घटनास्थळी पोहोचले. बॉम्ब शोधून काढण्यासाठी मानकानुसार गुप्त मोहीम राबविण्याचा तात्काळ निर्णय घेण्यात आला. बॉम्बशोधक पथक आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलच्या (सीआयएसएफ) अधिकाऱ्यांनी परिसर ताब्यात घेतला आणि प्रवासी व तेथील दुकानदारांना बाहेर काढून त्यांना १०० ते १५० मीटर अंतरावर नेण्यात आले. सीआयएसएफ आणि सोनेगाव पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतला. या मॉक ड्रीलवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पर्यवेक्षक नेमण्यात आला होता. तो विमानतळावर सुरू असलेल्या घटनाक्रमावर लक्ष ठेवून होता. तासभर चाललेल्या या घटनाक्रमात बॉम्बशोधक पथकाने बॉम्ब शोधून काढला आणि निकामी करण्यासाठी घेऊन गेले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. केंद्र सरकारच्या नागरी उड्डयण संचालनालयाच्या आदेशानुसार मॉक ड्रील घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर, वरिष्ठ व्यवस्थापक (आॅपरेशन) लक्ष्मीनारायण, मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सरटकर, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे उपकमांडंट गुरजीतसिंग आणि वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. ही कारवाई भारतीय नागरी उड्डयण संचालनालयाच्या आदेशानुसार आणि ‘सीआयएसएफ’च्या अधिनस्थ करण्यात आली. (प्रतिनिधी)
नागपूर विमानतळावर बॉम्ब!
By admin | Published: September 30, 2016 3:25 AM