आनंद डेकाटे
नागपूर : युक्रेनच्या राजधानीपासून ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या आमच्या शहरात बुधवारपर्यंत सारे काही सुरळीत होते; पण गुरुवारची पहाट भीतीदायक परिस्थिती घेऊन उगवली. सकाळपासूनच रशियन क्षेपणास्त्रांचे हल्ले आमच्याही शहरांवर सुरू झाले. क्षणोक्षणी परिस्थिती अतिशय भयावह होत चालली आहे. सर्वत्र बॉम्बच्या हल्ल्याने उद्ध्वस्त इमारती, रस्ते आणि आकाशात धुराचे डोंगर साचले आहेत. समोरच्या क्षणी काय होईल, या विचाराचा भयकंप प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. कुठूनतरी मदत येईल या अपेक्षेने आम्ही सर्व भारतीय जीव मुठीत घेऊन एकेक क्षण काढत आहोत.
युक्रेनच्या इव्हानो फ्रँकव्हिस्क या शहरात राहणाऱ्या नागपूरच्या पवन मेश्राम या विद्यार्थ्याने तेथील भयावह परिस्थितीचे चित्र ‘लोकमत’शी बोलताना मांडले. पवन हा नागपुरातील धरमपेठ येथील रहिवासी असून, तो सध्या युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. ताे इव्हानो फ्रँकव्हिस्क या शहरातील नॅशनल मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. दोन वर्षांपूर्वीच तो तिथे गेला. ‘लोकमत’ने त्याच्याशी संपर्क साधला असता पवनने सांगितले की, रशियाने आतापर्यंत अर्धे युक्रेन ताब्यात घेतले आहे. राजधानी किव्हपासून आमचे शहर ५०० किलोमीटर अंतरावर आहे. भारतातील जवळपास १२०० विद्यार्थी येथे सध्या शिक्षण घेत आहेत. संपूर्ण युक्रेनमध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आमच्या शहरात तणावाचे वातावरण होतेच. परंतु, आमचे शहर कालपर्यंत हल्ल्यापासून सुरक्षित होते. परंतु, बुधवारी हल्ले झाले. स्ट्रीटवर खूप सारे बंकर तयार करण्यात आले होते. त्याठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. संपूर्ण इव्हानोमध्ये हायड्रोलेटिक पाईप, जिथून विजेचा, पाण्याचा पुरवठा होत होता, त्याचठिकाणी हल्ला केला आहे. गावं आणि शहरांमध्ये वीज, पाणी याचा तुटवडा यावा म्हणून हा हल्ला केला आहे. सगळीकडं आणीबाणी निर्माण झाली आहे. बाहेर सगळीकडं धूर दिसत आहे. एटीएममधून पैसे निघत नाही आहे. सर्व विद्यार्थी घाबरलेले आहेत.
भारतीय दूतावासाने अंधारात ठेवले
पवनने सांगितले की, जवळपास दोन महिन्यांपासून तणावाचे वातावरण हाेते. यातच कोरोना काळापासून आमचे लेक्चर्स हे ऑनलाईन होते. त्यामुळे काही विद्यार्थी हे भारतात परत गेले. आम्ही सर्व विद्यार्थी भारतीय दूतावासाच्या संपर्कात होतो. त्यांना परिस्थितीची जाणीव करून देत भारतात परत पाठविण्याची विनंती करीत होतो. परंतु, दूतावासातील अधिकारी आम्हाला समजावत राहिले. काही होणार नाही, घाबरू नका, आणि अचानक २० फेब्रुवारीला आम्हा सर्वांना युक्रेन सोडून मायदेशी परतण्याची सूचना देण्यात आली. एकप्रकारे भारतीय दूतावासाने आम्हाला अंधारात ठेवले.
-'इतकं महाग तिकीट कसं काढू?'
पवनने सांगितले की, भारतीय दूतावासाने २० तारखेला आम्हाला युक्रेन सोडण्यासंदर्भात सूचना केली. भारतात जाण्यासाठी एअर इंडियाची विमानं २२, २४ आणि २६ तारखेला उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तिकीट प्रत्येकाने आपापलं काढायचं आहे. एरव्ही किव्ह ते दिल्ली या प्रवासासाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. परंतु, आता ६० ते ८० हजार रुपये आकारले जात आहेत. इतकं महाग तिकीट कसं काढणार? सध्या तर इथे नो फ्लाइट झोन झालं आहे, सगळ्या फ्लाईट बंद आहेत.
केंद्र व महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती
युक्रेनमध्ये सध्या सगळ्या फ्लाईट बंद झाल्या आहेत, इथं नो फ्लाइट झोन झालं आहे, त्यामुळे भारत सरकारनं येथील लोकांना एअरलिफ्ट करावं, अशी विनंती पवनने केली आहे. यासोबतच त्याने महाराष्ट्र सरकारकडेही विनंती केली आहे की, त्यांनी तिकिटांचे दर कमी होण्यासाठी काही केलं तर बरं होईल. तिकिटाचे दर कमी झाले तर चांगलंच आहे. नाहीतर आम्हाला तिकीट ज्या किमतीला उपलब्ध असेल ते घेऊन परतावं लागेल, असेही पवनने सांगितले.