नागपूर : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील शौचालयात बॉम्ब असल्याचा ई मेल मिहान इंडिया लिमिटेडच्या संचालकांना पाठविण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. सीआयएसएफसह शहर पोलिसांनी विमानतळाचा कोपरा न कोपरा पिंजून काढला. परंतु पोलिसांना काहीच आक्षेपार्ह आढळले नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील शौचालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई मेल एअरपोर्ट अॅथॉरिटीला सोमवारी २४ जूनला सकाळी ६.५३ वाजता आला होता. हा ई मेल देशभरातील सर्वच विमानतळांना पाठविण्यात आला होता. ई मेल मिळताच एअरपोर्ट अॅथॉरिटी व मिहान इंडिया लिमिटेडने सोनेगाव पोलिसांना सूचना दिली. सोनेगाव ठाण्याचे व शहर पोलिस असे एकुण ७९ जणांनी विमानतळाचा परिसर पिंजून काढल्यानंतर काहीच आढळले नव्हते. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असल्यामुळे पोलिसांनी खास खबरदारी घेतली होती. परंतु दिवसभर बारकाईने पाहणी करूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान मिहान इंडिया लिमिटेडचे संचालक आबिद रुही यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार २५ जूनला सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास पुन्हा विमानतळावरील शौचालयात बॉम्ब असल्याचा ई मेल मिळाला. हा ई मेल एकट्या नागपूर विमानतळालाच पाठविण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. झोन १ चे उपायुक्त अनुराग जेन, सहायक पोलिस आयुक्त, सोनेगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन मगर पोलिसांच्या ताफ्यासह विमातळावर पोहोचले. पोलिसांनी शीघ्र कृती दल, रॅपीड अॅक्शन फोर्स, बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या साह्याने विमानतळाच्या कानाकोपºयाची बारकाईने तपासणी केली. तर सीआयएसएफच्या जवानांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने विमानतळाच्या आतील परिसरात पाहणी केली. परंतु सीआयएसएफ व शहर पोलिसांना काहीच आक्षेपार्ह आढळले नाही. सोनेगाव पोलिस सायबर पोलिसांच्या मदतीने ई मेल पाठविणाºया आरोपींचा शोध घेत आहेत.
बॉम्बचा चौथा ई मेल आल्याने खळबळनागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्ब ठेवला असल्याचा आलेला हा चौथा ई मेल आहे. यापूर्वी २९ एप्रिल २०२४, १८ जून, २४ जून आणि आज मंगळवारी २५ जूनला चौथा ई मेल पाठविण्यात आला आहे. सातत्याने बॉम्ब ठेवला असल्याचा ई मेल येत असल्यामुळे विमानतळ प्रशासनात खळबळ उडाली आहे.
चार ठिकाणी केली नाकेबंदीविमानतळावर बॉम्ब असल्याच्या ई मेल मुळे खळबळ उडाली असताना सोनेगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन मगर यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून विमानतळ परिसरात चार ठिकाणी नाकेबंदी केली. यात हॉटेल प्राईड चौक, विमानतळ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, आमराई परिसर आणि सी झार हॉटेल परिसरात ही नाकाबंदी करून प्रत्येक ये-जा करणाºया वाहनचालकांची तसेच विमानतळावर येणाºया प्रत्येकाची तपासणी करण्यात आली. यासोबतच पोलिसांनी विमानतळाच्या बाह्य भागातील बाथरुम, कचराकुंड्या आदींची बारकाईने तपासणी केली.