योगेश पांडे नागपूर : मेयो, मेडिकलमध्ये सोमवारी सायंकाळी बॉम्ब असल्याचा पोलिसांना फोन आल्यानंतर दोन तास प्रचंड खळबळ उडाली. बॉम्बच्या भितीने मेयोत दाखल असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक हादरले होते. या दोन्ही रुग्णालयात बॉम्ब शोधक पथकाने दीड ते दोन तास कसून तपासणी केली. परंतु काहीच आढळून न आल्याने यंत्रणांसह सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
पोलीस नियंत्रण कक्षात सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास फोन आला. एका अज्ञात व्यक्तीने मेयो व प्रादेशिक मनोरुग्णालात बॉम्ब असल्याचे सांगितले. पोलिसांनी ही बाब गंभीरतेने घेत तातडीने याची माहिती बॉम्ब शोधक पथकाला दिली. पोलिसांचे बॉम्ब शोधक-नाशक पथक (बीडीडीएस), श्वानपथकासह मोठा ताफा दोन्ही ठिकाणी रवाना करण्यात आला. त्यांनी आंतररुग्ण विभागातील रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर काढून तपासणी केली. त्यानंतर मेडिसीन वॉर्ड, सर्जिकल कॉम्प्लेक्स व क्षयरोग वॉर्डाची पाहणी केली. याच दरम्यान एक पथक प्रादेशिक मनोरुग्णालयात तपास करीत होते. पथकाने बाह्यरुग्ण विभागापासून ते रुग्णालयाच्या आतील रस्त्याच्याकडेची तपासणी केली. मनोरंजन हॉल, मेडिकल स्टोअर्स, औषधी वितरण कक्ष, गार्ड रुमपर्यंतचा परिसर पिंजून काढला. पथकाच्या या दीड ते दोन तासाच्या तपासणीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण होते. परंतु कुठेच काहीच आढळून आले नाही.
फोन कुठून आला ?दरम्यान, संबंधित फोन नेमका कुठून आला याचा शोध सुरू आहे. काही आठवड्यांअगोदर संघ मुख्यालय व स्मृतिमंदिर उडवून देण्याचे फोनदेखील पोलिसांना आले होते. त्यावेळीदेखील यंत्रणांची धावपळ उडाली होती. इस्पितळासारख्या संवेदनशील ठिकाणी बॉम्ब असल्याचा फोन करून दहशत पसरविण्याचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.