मताधिक्यात वाढ : विजयाचे समीकरण बदलण्यात यश आनंद डेकाटे - नागपूर महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन समाज पार्टीने स्वबळावर लढत आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. गेल्या काही निवडणुकीमध्ये बसपाचा हत्ती जोरात चालला असून विजयाचे समीकरण बदलण्यात बसपाला यश आले आहे. या निवडणुकीतही बसपाचा हत्ती जोरात चालला. विदर्भातील ६१ उमेदवारांनी तब्बल ६ लाख ८७ हजार ७८३ मते घेतली. यापैकी ४ उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर तर १६ उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. उर्वरित उमेदवारांनीही समाधानकारक मते घेतली. परंतु तरीही बसपाला यंदा आमदारकीचे खाते उघडता आले नाही. बहुजन समाज पार्टी ही महाराष्ट्रात एक सशक्त राजकीय पार्टी असून विजयाचे समीकरण बदलणारा पक्ष अशी त्याची ओळख आहे. महाराष्ट्रात बसपाची मुख्य शक्ती ही विदर्भ आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून बसपाचा सफाया झाला. देशातील तिसरी राष्ट्रीय पार्टी असलेल्या बसपाच्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत बसपा सुप्रीमो मायावती यांना हरियाणा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपासून बरीच अपेक्षा होती. यातही महाराष्ट्रावरच अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यानुसार मायावती यांच्या महाराष्ट्रात आठ जाहीर सभा झाल्या. यापैकी नागपूर आणि भंडारा येथे प्रत्येकी एक सभा घेण्यात आली. या सभेचा फायदाही बसपाला झाला. विदर्भात बसपाचे एकूण ६१ उमेदवार रिंगणात होते. यापैकी उत्तर नागपूरमधून किशोर गजभिये, भंडारा येथून देवांगणा गाढवे-वालदे आणि उमरेडमधून वृक्षदास बन्सोड यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना घाम फोडला. हे तिघेही दुसऱ्या क्रमांकावर राहिले. किशोर गजभिये यांनी तब्बल ५५,१८७ मते घेतली. महाराष्ट्रात बसपाच्या उमेदवारांमध्ये ही सर्वाधिक मते ठरली. त्यानंतर भंडारा येथून देवांगणा गाढवे-वालदे यांनी ४५,००० मते घेतली. उमरेडमधून वृक्षदास बन्सोड यांनी ३४,०७७ मते घेतली. याशिवाय राजेंद्र पडोळे १६,५४०, (दक्षिण-पश्चिम नागपूर), सत्यभामा लोखंडे २३,१५६ (नागपूर-दक्षिण), दिलीप रंगारी १२,१६४(पूर्व नागपूर), अहमद कादर १४,२२३ (पश्चिम नागपूर), सुरेश डोंगरे ११,०९७ (सावनेर), महेंद्र गणवीर, ३१,६४९ (साकोली), अॅड. राजेश सिंग १०,३४४ (बल्लारपूर), मो. शमी लोखंडवाला ३४,४९८ (यवतमाळ), अभिजित ढेपे २९,२२९ (धामणगाव रेल्वे), हाजी मो. रफीक शेख २०,६०२ (अचलपूर), उमेश म्हैसकर २४,९७३ (देवळी पुलगाव), प्रलय तेलंग २५,१०० (हिंगणघाट), नीरज गुजर २२,२८३ (वर्धा) अशी उमेदवारांनी भरघोस मते घेतली. अनेक उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले, तर उर्वरित उमेदवारांनी भरघोस मते घेत विजयाचे समीकरण बदलविले. परंतु बसपाला या निवडणुकीमध्येसुद्धा खाते उघडता आले नाही.
बसपाच्या हत्तीने फोडला घाम
By admin | Published: October 21, 2014 12:56 AM