नागपूर : महामेट्राने एअरपोर्ट मेट्रो स्टेशननंतर चितारओळ मेट्रो स्टेशनवर नागरिकांसाठी ‘बुक कॉर्नर’ सुरू केले आहे. वाचकांसाठी महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, विनोबा भावे, डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील तसेच इतर साहित्यिक पुस्तके उपलब्ध आहेत. संती गणेशोत्सव मंडळाने बुक कॉर्नरचे पालकत्व स्वीकारले आहे.
नागरिकांना मेट्रो रेल्वेशी जोडण्यासाठी अशा प्रकारचे विविध उपक्रम महामेट्रोतर्फे राबविण्यात येत आहेत. यामध्ये मल्टी मॉडेल इंटिग्रेशन, लास्ट माईल कनेटिव्हिटीचा समावेश आहे. यापूर्वी एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू केले. विरंगुळा केंद्राचे पालकत्व विदर्भ साहित्य संघाने स्वीकारले आहे.
बुक कॉर्नर नि:शुल्क असून सभासद असणे बंधनकारक नाही. सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत नागरिकांसाठी खुले राहील. विविध भागात राहणाऱ्या नागरिकांनी सुलभ, सुखकर, सुरक्षित, मेट्रोने प्रवास करून या बुक कॉर्नरचा लाभ घेता येईल. मेट्रो भवनातील तळमजल्यावर व्हिजिटर्स आणि विद्यार्थ्यांसाठी महामेट्रोचे विविध उपक्रम आणि प्रदर्शन सुरू केले आहे.