लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या नेतृत्वात बुक बॅगेज डॉट कॉम प्रा. लि. या कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार आता प्रवासी घरबसल्या आपल्या रेल्वे यात्री मोबाईल अॅपवरून सामानाचे बुकिंग करू शकणार आहेत.
रेल्वे प्रवाशांनी आपल्या सामानाचे बुकिंग या अॅपच्या माध्यमातून केल्यानंतर संबंधित कंपनीतर्फे घरून सामान घेऊन रेल्वेस्थानकावर नेण्यात येईल. तसेच आलेले सामानही प्रवाशांच्या दारापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ही सेवा पार्सलसाठीही उपलब्ध राहणार आहे. या सर्व सेवांसाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार आहे. कंपनीच्यावतीने किफायतशीर दरात ही सेवा देण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेला नॉन फेअर रेव्हेन्यू अंतर्गत दरवर्षी ५.५० लाखाचा महसूल मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आतापर्यंत राबविलेला हा १० वा उपक्रम आहे.
भारतीय रेल्वेत पहिल्यांदा नागपुरात ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कराराच्या वेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थूल, वाणिज्य निरीक्षक ताराप्रसाद आचार्य, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल घोष, सहसंस्थापक संदीप आचार्य उपस्थित होते.