लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलिसांनी क्रिकेट बुकी व हवाला व्यवसायिकांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची चर्चा देश-विदेशात होत आहे. क्रिकेटच्या सट्टेबाजीत व हवाला व्यवसायात दशकांपासून ज्या लोकांचे वर्चस्व आहे, पोलिसांनी त्यांच्यावर नजर कसल्याने व्यापारी जगतात खळबळ उडाली आहे. बहुतांश क्रिकेट सट्टेबाज व हवाला व्यवसायिकांनी शहरातून पलायन केले आहे.
दरम्यान सोमवारी रात्री अटक केलेल्या बुकी व हवाला व्यवसायिकांची मंगळवारी सकाळी जामिनावर सुटका झाली. यात संजय ऊर्फ छोटू गौरीशंकर अग्रवाल (५३), जितेंद्र रामचंद्र कामनानी (५०) रा. रामदासपेठ, प्रशांत बालकृष्ण शहा (४९) रा. नेताजीनगर, कळमना, अभिषेक नीलम लुणावत (३८) रा. बापुराव गल्ली, शंकरलाल देवीलाल कक्कड (५६), शैलेश श्यामसुंदर लखोटिया (३९) रा. गरोबा मैदान तसेच पंकज मोहनलाल वाधवानी (४१) रा. वसंत शाह चौक जरीपटका यांचा समावेश आहे. लकडगंज पोलिसांनी ३० सप्टेंबर रोजी पीयूष गोपीचंद अग्रवाल ऊर्फ बन्सल याला आयपीएलवर सट्टेबाजी करताना पकडले होते. या प्रकरणात लालगंज पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. परंतु पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनात तपास सुरू होता. त्यात पीयूष याच्याशी जुळलेल्या क्रिकेट सट्टाबाजी व हवाला व्यवसाय करणाऱ्यांचे नाव पुढे आले होते. पोलिसांनी त्यांच्या घरी व कार्यालयात धाड टाकली असता काही बुकी व हवाला व्यवसायी भूमिगत झाले तर सात आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांना सीताबर्डी येथील अति. पोलीस आयुक्त कार्यालयात आणले. तिथे पोलीस आयुक्तांनी स्वत: त्यांना विचारपूस केली. आयुक्तांनी त्यांना हे प्रकार बंद करण्याची चेतावणी दिली. अन्यथा परिणाम वाईट होतील, असा इशारा दिला. रात्रभर चौकशी झाल्यानंतर सकाळी त्यांची जमानतीवर सुटका झाली.
या कारवाईमुळे बुकी व हवालात सहभागी असलेल्यांबरोबर शहरातील व्यापार जगतात परिणाम होणार आहे. क्रिकेट सट्टेबाजी बरोबरच शहरात मोठे व्यापारिक व्यवहार हवालाच्या मार्फत होतात. शहरातील बहुतांश मोठे व्यवसायिक हवालावर निर्भर आहे. इतवारीतून हवालाद्वारे दररोज कोट्यवधी रुपयांचा फेरफार होतो. सणांचे दिवस असल्याने व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढेल, अशी अपेक्षा होती. हवाला व्यावसायिकांवर झालेल्या कारवाईमुळे बेनामी व्यवहाराची व्यापाऱ्यांना चिंता भेडसावत आहे. पोलिसांच्या रडारवर आलेल्या हवाला व्यवसायिकांचा बाजारावर दबदबा आहे. आज सकाळपासून त्यांनी आपला व्यवसाय गुंडाळण्यास सुरुवात केली. तर क्रिकेट सट्टेबाजांनी परिस्थिती सुधारेपर्यंत नागपुरातून आपले धंदे बंद करण्याचे निश्चित केले.
मुंबईची मंडी झाली ठप्प
नागपूर पोलिसांच्या कारवाईने क्रिकेट सट्ट्याची मुंबईतील मंडी ठप्पा झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अशोक सोलापुरे याला सोलापुर पोलिसांनी पकडले आहे. त्यामुळे मुंबईचे बुकी सतर्क झाले आहे. या कारवाईमुळे त्यांनी धंदे बंद केले आहे. शहरातील बुकी आजच्या घडीला देशभरातील बुकींसोबत वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करीत आहे. शहरात घडणाऱ्या घडामोडी लक्षात घेता नागपुरातून पलायन करीत असल्याची चर्चा आहे. बुकींना येणाऱ्या दिवसात शहर पोलीसांकडून मोठी कारवाई होण्याची चिंता भेडसावत आहे.
आयुक्तांचे नेटवर्क भारी
पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे शहरातील बुकींची नाडी ओळखतात. त्यांनी डीसीपी म्हणून शहरात काम केले आहे. त्यांचे नेटवर्क भारी आहे. त्यांनी शहरात मॅच फिक्सींग प्रकरण उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांची अन्य ठाणेदार दिशाभूल करू शकत नाही. पोलीस आयुक्तांच्या व्यूहरचनेमुळेच मोठे बुकी पोलिसांच्या हाती लागले आहे. चर्चा अशीही आहे की लकडगंज ठाण्यातून काही बुकींना पूर्वीच कारवाईबाबत सतर्क केले होते. त्यामुळे ते हाती लागले नाही.