नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरातील कोट्यवधी क्रिकेटरसिकांना दिवाळीची अनुभूती देणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप सामन्याला रविवारी सुरुवात झाली. पारंपरिक शत्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट संघातच सलामीचा (पहिला) सामना होणार असल्याने बुकींनी भारताला कल दिला होता. परंतु, सहा ओव्हरमध्येच बुकीबाजार गडबडला. कोट्यवधींची उलटफेर करणारे पंटर कंगाल अन् बुकी मालामाल झाले.
भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यादरम्यान देशभरात हजारो कोटींचा सट्टा लागतो. त्यामुळे टी-२० च्या सामन्याच्यानिमित्ताने स्थानिक बुकींनी दिवाळीआधीच जोरदार आतषबाजीची तयारी चालवली होती. देशाचे सेंटर पॉईंट असलेल्या नागपुरातून मध्यभारतातील बुकी बाजार संचलित केला जातो. छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवाच नव्हे, तर दुबईत बसलेले बुकीही नागपूर सेंटरच्या सट्ट्याला कनेक्ट असतात.
२००७ मध्ये पाकिस्तानला नमवून टी-२० चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारताला बुकींनी आजच्या सामन्यातही विजयाचे दर दिले होते. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, सामना सुरू होण्याच्या एक तासापूर्वी नागपुरातून २०० कोटींची लगवाडी होण्याचे संकेत बुकींना मिळाले होते. बुकींच्या ऑनलाईन बेटिंगचे प्लॅटफॉर्म बेट ३६५ आणि लँडब्रोक्सनुसार, बुकींच्या नजरेत यावेळीचा विश्वचषक विजेता भारतच असल्याने सामना सुरू होण्यापूर्वी भारताच्या बाजूने कल देत बुकींना आजच्या सामन्याचा रेट ५७, ५८ ठेवला होता. नंतर भारताच्या बाजूनेच ६०-६२ चा रेट आला. मात्र, ६ ओव्हरमध्येच बुकीबाजार गडबडला.
भारताने अवघ्या ३ धावांवर रोहित शर्माची, नंतर के.एल. राहुल आणि त्यानंतर सूर्यकुमार अशा तीन विकेट गमाविल्यामुळे बुकींना पाकिस्तानला फेवर केले. त्यामुळे पाकिस्तानच्या बाजूने ७६-७८ असा रेट गेला. नंतर मात्र ११ ओव्हरमध्ये ६६ धावा बनवून भारताने पुन्हा बुकींना आपल्याकडे आकर्षित केले. त्यामुळे भारतावर ८८-८९ असा दर दिला गेला. पहिली खेळी संपली तेव्हा १५१ धावांची पावती फाडून भारताने ७ विकेट गमावल्या होत्या. तोपर्यंत बुकीबाजारात ३०० कोटींपर्यंतच्या सट्टयाची लगवाडी झाल्याचे सांगितले जात होते.
टॉसचे गणित चुकले
नाव न छापण्याच्या अटीवर एका बड्या बुकींनी ‘लोकमत’शी बोलताना त्यांचे पहिले गणित चुकल्याचे सांगितले. टॉस भारत जिंकेल, असा बुकींचा अंदाज होता. मात्र, तो चुकला. टॉस पाकिस्तानने जिंकला. त्यामुळे प्रारंभीपासूनच फंटर्सचे (लगवाडी करणारे) नुकसान झाले.
बुकींच्या नजरेत ‘टॉप सेव्हन’
बुकींच्या मतानुसार विश्वचषकाच्या दावेदारीत भारत आणि इंग्लंड प्रमुख प्रतिस्पर्धी राहतील. कारण भारतानंतर सर्वाधिक सट्टा इंग्लंडवरच लागला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला बुकींनी स्थान दिले आहे. सर्वात कमकुवत टीम म्हणून बुकींच्या नजरेत दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे.