नागपूर: सोनेगावच्या पन्नासे ले-आऊटमध्ये चालणाऱ्या यवतमाळच्या क्रिकेट बेटिंग अड्ड्यावर छापा टाकून गुन्हे शाखेने तीन बुकींना अटक केली आहे. दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या अड्ड्यावरून कार, लॅपटॉप, मोबाइलसह ३५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुन्हेशाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पन्नासे ले आऊट येथील पर्ण अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ३०१ मध्ये सट्टेबाजीचा अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास धाड टाकली असता तेथे हरिओम उमेश बत्रा (३१,केळापूर, यवतमाळ), रवी नंदकिशोर बोरेले (३८, पांढरकवडा, यवतमाळ) आणि अयफाज शेख कादीर (२३ पांढरकवडा, यवतमाळ) हे आढळले. रॉयल चॅलेंजर बंगळुरू व सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर ते लगवाडी-खायवाडी करत होते. त्यांच्या ताब्यातून एलसीडी टीव्ही, रेकॉर्डर, लॅपटॉप, २३ मोबाईल फोन, दोन कार व एक दुचाकी असा ३५.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तीनही आरोपींविरोधात सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तेथील पथकाच्या हवाली करण्यात आले आहे.
बत्रा आणि बोरेले हे क्रिकेट बुकी आहेत व आयफाज त्यांच्यासोबत काम करतो. ते अनेक दिवसांपासून क्रिकेटवर बेटिंग करत होते. त्यांनीदहा महिन्यांपूर्वी पन्नास ले आऊटमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन क्रिकेट सट्टा सुरू केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळमध्ये आरोपींचे मोठे रॅकेट आहे. त्यांचे बहुतांश ग्राहक यवतमाळचे आहेत. यवतमाळ पोलिसांपासून वाचण्यासाठी ते सोनेगावमध्ये दहा महिन्यांपासून सक्रिय होते. विश्वचषकादरम्यानही येथून सट्टेबाजी केली जात होती. नागपुरातील काही बुकीही त्यांच्याशी संबंधित आहेत. पोलीस निरीक्षक किरण कबाडी, एपीआय मयूर चौरसिया, राजेश देशमुख, रवी अहिर, प्रशांत गभने, श्रीकांत उईके, अनुप यादव, प्रवीण रोडे, आशिष वानखेडे, अभय यांच्या पथकाने ही कारवाई केली.