फडणवीस यांच्याकडून अपेक्षा : विकास कामांना गती मिळणारगुंतवणूकदार पुढे येणार:गेल्या काही वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात मंदी आहे. मिहान प्रकल्पाच्या घोषणेसोबतच नवखे बिल्डर्स आणि विकासकांची या क्षेत्रात गर्दी झाली. जमिनीच्या किमती आकाशाला भिडल्या. लोकांना परताव्याची हमी देत अनेकांनी अविकसित ले-आऊट आणि घरे विकली. परताव्याच्या नावाखाली लोकांना काहीच मिळाले नाही. दुप्पट वा तिप्पट रक्कम मिळण्याची अपेक्षा तर सोडाच गुंतविलेली रक्कमही त्यांना मिळालेली नाही. या कारणाने गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातून काढता पाय घेतला. आता फक्त गरजू लोकच घरांची खरेदी करीत असल्याचे चित्र बांधकाम क्षेत्रात दिसत आहे. फडणवीस यांच्यामुळे गुंतवणूकदार पुढे येतील, असा विश्वास के्रडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष प्रशांत सरोदे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.लवकरच उत्साह संचारणार: बांधकाम क्षेत्रात उत्साह संचारणार हे निश्चित आहे. पण त्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होणे तेवढेच गरजेचे आहे. गेल्या १५ वर्षांत आघाडीची सत्ता महाराष्ट्रात असल्याने पायाभूत सुविधांचा विकास पश्चिम महाराष्ट्रात झाला. २००४ मध्ये पायाभरणी झालेला मिहान पूर्ण वेगाने धावायला हवा होता. काहीच कंपन्या वगळता बहुतांश कंपन्यांनी जागा घेण्यापलीकडे काहीच केलेले नाही. मुख्यमंत्रिपदी फडणवीस विराजमान होत असल्याने मिहानच्या कामाला गती मिळेल. नवीन कंपन्यांमध्ये उत्साह संचारेल आणि कारखाने सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. त्याचा फायदा बांधकाम क्षेत्राला होईल. मिहान, एम्स्, कॅन्सर हॉस्पिटल, नवीन शासकीय प्रकल्पांच्या बरोबरीने खासगी बांधकाम क्षेत्राला पुन्हा सुगीचे दिवस येतील, असा विश्वास आहे. लोकांचा विश्वास वाढणार : रखडलेले आणि नवीन प्रकल्पांसह पायाभूत सुविधांचा विकास होण्याच्या अपेक्षेने लोकांचा बांधकाम क्षेत्रावरील विश्वास वाढणार आहे. जेवढे गुंतवणूकदार पुढे येतील, तेवढाच बांधकाम क्षेत्राचा विकास होईल. मिहानचा विकास गरजेचा:नागपूरच नव्हे तर विदर्भाचा कायापालट करण्याची क्षमता एकट्या मिहानमध्ये आहे. राजकीय इच्छाशक्तीने मिहानमध्ये देशीविदेशी कंपन्यांची रेलचेल वाढताच तेवढ्याच प्रमाणात घरांची आवश्यकता भासणार आहे. साहजिकच या प्रकल्पामुळे बांधकाम क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास बांधकाम व्यावसायिकांमध्ये असल्याचे प्रशांत सरोदे यांनी सांगितले.
रिअल इस्टेटमध्ये येणार बूम!
By admin | Published: October 30, 2014 12:46 AM