पूर्व विदर्भात पुढाकार : गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवण्यावर भर आनंद डेकाटे। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी शेतीसोबतच त्यांना जोडधंदा उपलब्ध करून झाला. परंतु त्यात फारसे यश आले नाही. यंदाही तसाच प्रयत्न सुरू झाला असून यावेळी पूर्व विदर्भातील गोड्या पाण्यात मत्स्य व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विभागीय प्रशासनाने यासाठी घेतलेला पुढाकार आणि प्रयत्न पाहता ही ‘नीलक्रांती’ विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच वरदान ठरणार आहे. राज्य शासनाने पुढील पाच वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना विविध शेतीपूरक व्यवसायाकडे वळविण्याचा संकल्प घेतला आहे. त्या दिशेने कामाला सुरुवात झाली आहे. नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी पूर्व विदर्भातील नैसर्गिक जलस्रोतांचा वापर करून गोड्या पाण्यातील मासेमारी वाढविण्यावर भर दिला आहे. यासाठी ‘तलाव तिथे मासोळी’ उपक्रम राबविले जात आहे. पूर्व विदर्भात गोड पाण्यातील जलसाठ्यांची संख्या मोठी आहे. या विभागात १४ मोठे प्रकल्प, ४९ मध्यम प्रकल्प आणि राज्य व स्थानिक क्षेत्र मिळून ६१८ लघुसिंचन प्रकल्प आहेत. तसेच ६७३४ माजी मालगुजारी तलाव हे गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी उपयुक्त आहेत.पूर्व विदर्भात गोड्या पाण्यातील नीलक्रांतीला चालना देण्यासाठी मत्स्यजीरे ते मत्स्यबोटुकली आणि बोटुकली ते मत्स्यसंवर्धन उत्पादन कार्यक्रम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यतील ७० महसुली मंडळाची निवड करण्यात आली आहे तर वर्धा जिल्ह्यातील ४७, भंडारा ३४, गोंदिया ३३, चंद्रपूर ५० आणि गडचिरोली जिल्ह्यातील ४० अशा एकूण २७४ महसुली मंडळाची निवड करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात ६४ तालुक्या्रतील तितक्याच महसुली मंडळात हा कार्यक्रम नियोजित आहे. यामध्ये एकूण २७५ तलावांची निवड करण्यात आली आहे. मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी मास्टर्स ट्रेनर्सची निवड करण्यात आली आहे. मासेमारी सोसायटीतील सदस्य, महिला बचत गटातील महिला, पेसा समन्वयक आदींचा यात समावेश आहे. यांनाही प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. यामध्ये ओडिशा व छत्तीसगड येथील तज्ज्ञाची विशेष मदत घेतली जात आहे. विभागीय आयुक्त अनुप कुमार हे स्वत: प्रत्येक घडामोडीचा आढावा घेत आहेत. साकोली, भंडारा, वर्धा, नागपूर येथे याप्रकारच्याप्रशिक्षण कार्यशाळा पार पडल्या आहेत.विपणनावरही विशेष भर दिला जाणारपूर्व विदर्भ हे गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी उपयुक्त आहे. आम्ही आमच्यापरीने प्रयत्न सुरू केले आहेत. येथील मासे दूरपर्यंतच्या बाजारपेठेत जावेत. यासाठी विपणनावर विशेष भर दिला जाईल. गोंदिया हे विपणनाच्या दृष्टीने केंद्र ठरू शकते. यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले.दीर्घकालीन आराखडा तयार करण्याची जबाबदारी ‘माफसू’वर पूर्व विदर्भाच्या मत्स्य उत्पादनासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ते याबाबतीत अभ्यास करून एक दीर्घकालीन आराखडा तयार करतील.
‘नीलक्रांती’ ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान
By admin | Published: July 03, 2017 2:35 AM