पतंजली योगपीठाला २०० एकर जागा : गडकरी यांनी घेतली आढावा बैठक नागपूर : काटोल-नरखेड या संत्रा उत्पादक भागात पतंजली योगपीठातर्फे स्वामी रामदेवबाबा यांच्या पुढाकाराने काटोल येथे संत्रा उत्पादन प्रक्रिया कारखाना उभारणार असून त्यासाठी एमआयडीसीची २०० एकर जागा ताब्यात घेणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयुक्त पत्रपरिषदेत दिली.काटोलप्रमाणेच अमरावतीतही पतंजली योगपीठ जागा घेणार आहे. या संदर्भातील एक आढावा बैठक केंद्रीय रस्ते व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने झाली. या बैठकीला पतंजली पीठातर्फे आचार्य बाळकृष्णन, खासदार कृपाल तुमाने, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार अनिल सोले, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. आशिष देशमुख, महापौर प्रवीण दटके, मल्लिकार्जुन रेड्डी, विकास कुंभारे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.काटोलचा संत्रा प्रक्रिया कारखाना १९९७ मध्ये सुरू झाला होता. फेब्रुवारी १९९७ ते मे २००१ पर्यंत प्रकल्प सुरू होता. त्यावेळी ११.४७ कोटी रुपये खर्च या प्रकल्पावर झाला. शासन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संयुक्तपणे हा प्रकल्प सुरू केला होता. कालांतराने महामंडळाने मे. अलायन्स अॅग्रो इंडिया प्रा. लि. यांच्याशी करार करून त्यांना चालविण्यास हा कारखाना हस्तांतरित केला. २००१ नंतर हा प्रकल्प बंद पडला.काटोलच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या संत्रा कारखान्यासाठी पतंजली योगपीठाला वीज व पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे काटोल-नरखेड-अमरावती या भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्र्याला चांगली किंमत मिळणार आहे.शेतकऱ्यांना दिलासा नागपूर : मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संत्रा उत्पादनाला या कारखान्यामुळे चांगले दिवस येतील. संत्र्यापासून निर्माण होणारी विविध प्रकारची शुद्ध उत्पादने या भागातील नागरिकांना उपलब्ध होतील. स्वामी रामदेवबाबा आणि केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. नितीन गडकरी यांनी स्वामी रामदेवबाबा यांना विदर्भ व मराठवाडा या शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात पतजंलीचे उत्पादन सुरू करावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याची तयारी व्यक्त केली.त्यामुळे स्वामीजींनी या भागात पतंजलीचे उत्पादन असलेले कारखाने सुरू करण्याची तयारी दर्शविली. हा कारखाना व अन्य उपक्रमाने सुमारे १० हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.विदर्भातील वनात २०० प्रकारच्या जडीबुटीयावेळी पतंजली समूहाचे आचार्य बाळकृष्णन यांनी सांगितले की, आयुर्वेदामध्ये एकूण ३०० प्रकारच्या जडीबुटींची आवश्यकता असते. विदर्भ आणि गडचिरोली भागातील वनसंपत्ती पाहता २०० प्रकारची आयुर्वेदिक औषधे येथे उपलब्ध आहेत. तसेच जी औषध या भागात नाहीत त्या औषधांचे उत्पादन येथे होऊ शकते. ते लक्षात घेता त्या भागात विविध औषधे तयार करण्याची व्यवस्था आम्ही करणार. जडीबुटी औषध निमार्णासाठी या भागातील वातावरण पोषक असल्याचेही आचार्य बाळकृष्णन यांनी सांगितले.गडचिरोलीमध्ये होणार ‘अॅग्रोहॅक ’वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले की, राज्यात ७५ टक्के जमीन ही वन विभागाची असून ती जमीन आदिवासी गडचिरोली व इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून एकट्या गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ९० हजार हेक्टर जमीन आहे. या जमिनीवर उपलब्ध असलेल्या वनऔषधींवर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प तयार करून अॅग्रोहॅक तयार करण्यात येणार आहे. यामध्ये ३२५ औषधांची निर्मिती करण्यात येणार असून त्यामुळे परिसरातील आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. आदिवासी गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकासावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागणार असून यासाठी राज्यात २६५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. पतंजलीचे आचार्य बाळकृष्णन यांनीसुद्धा गडचिरोली येथे औषध निर्मितीचे एक युनिट लावण्यात येईल, तसेच तेथील आदिवासींना प्रशिक्षिण देऊन रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले.
काटोलच्या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाला बूस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 3:13 AM