लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टंचाईच्या काळात मोठ्या प्रमाणात बोअरवेल खोदल्या जातात. परंतु नागपूर जिल्हा परिषदेने गेल्या दोन वर्षापासून नवीन बोअरवेलची कामे न करता जुन्याच व बंद पडलेल्या बोअरवेलला पुनरुज्जीवित करण्याचा कार्यक्रम राबविला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून शासनाचे टंचाईच्या कामावर खर्च होणारे सात ते आठ कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी पत्रपरिषदेत दिली.
बर्वे म्हणाल्या की, शासनामार्फत बोअरवेल उभारणी व त्याची देखभाल-दुरुस्ती कार्यक्रम १९७२ पासून राबविण्यात येत आहे. परंतु कालांतराने काही बोअरवेल पूर्ण कार्यक्षम राहत नाही. त्यामध्ये पाण्याची आवक क्षमता कमी होणे, गाळ जमा होणे, झाडांची मुळे, दगड, माती, वाळू इत्यादीमुळे बोअरवेल बुजणे त्याचप्रमाणे ढासळल्यामुळे खोली कमी होणे, या कारणांमुळे अनेक बोअरवेल बंद अवस्थेत होत्या. तर ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर असून उपयोगात नसल्याने वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने नवीन बोअरवेल मंजुरीसाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे बऱ्याच गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत होती. निधीच्या कमतरतेमुळे व इतर तांत्रिक कारणांमुळे दरवर्षी नवीन बोअरवेल खोदणे अडचणीचे होते. त्यावर सीएसआर फंडातून बोअरवेल फ्लशिंग या अभिनव उपक्रमाची सुरुवात सावनेर विधानसभा क्षेत्रांतर्गत कळमेश्वर तालुक्यात ६० गावांमध्ये करण्यात आली. त्यामुळे त्या गावातील बंद असलेल्या बोअरवेल फ्लशिंग करून अत्यंत कमी खर्चात पुन्हा सुरू करण्यात आल्या. विशेष म्हणजे नवीन बोअरवेल खोदण्याकरिता जवळपास दीड लाखाचा खर्च अपेक्षित असून, फ्लशिंगसाठी जास्तीतजास्त अंदाजे ३० ते ३५ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे शासनाची मोठी बचत झाली. पत्रपरिषदेला सभापती भारती पाटील, तापेश्वर वैद्य, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे उपस्थित होते.
यंदा ११०० बंद पडलेल्या बोअरवेलचे होणार फ्लशिंग
यंदा टंचाई आराखड्यात १०० नवीन बोअरवेल खोदण्याची मंजुरी आहे. परंतु, त्यापेक्षा कमी खोदल्या जाणार असून, ११०० बोअरवेलचे फ्लशिंग करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती यांत्रिकी विभागाचे उपअभियंता नीलेश मानकर यांनी दिली.