नागपूर : कोतवाली व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत झोलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सायकलस्वार व दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
न्यू नंदनवन येथील चंद्रशेखर कंठीराम सोनकुसरे (४६) हे सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कोतवाली परिसरातील भोला गणेश चौकाकडून जगनाडे चौकाकडे सायकलने जात होते. दरम्यान, झुणका-भाकर केंद्राजवळ एका अज्ञात दुचाकी वाहनचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोतवाली पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दुसरा अपघात एमआयडीसीतील मेटल कंपनीसमोर घडला. गेल्या ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता विठ्ठलनगर हुडकेश्वर येथील राजेश त्र्यंबक वितोंडे (४५) हे आपल्या ॲक्टिव्हा गाडीने जात असताना एमआयडीसीतील मेटल कंपनीसमोर इनोव्हा गाडीच्या (एम.एच.०१-एव्ही-५६८७) चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवून दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यास लता मंगेशकर रुग्णालयात दखल करण्यात आले. तेथून लकडगंज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या १५ तारखेला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.