नागपूर : पाण्याचा अंदाज न घेता कन्हान नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेले दोघे बुडाले. मौदा तालुक्यातून वाहणाऱ्या कन्हान नदीत बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राहुल दशरथ ठोंबरे (२६, रा. मौदा) व उमेश श्रावण ठाकरे (२७, रा. गोरेवाडा,नागपूर) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. सायंकाळी ७ वाजेपर्यंत या दोघांचा शोध लागला नाही. शेवटी प्रशासनाच्यावतीने शोधमोेहिमेसाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मौदा येथील पांडुरंग बावणे यांची मुलगी ज्योती हिचा विवाह उमेश ठाकरे याच्यासोबत चार वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना एक वर्षाची मुलगी आहे. उमेश मंगळवारी सासुरवाडीला आला होता. बुधवारी दुपारच्या सुमारास बावणे यांच्या घराशेजारी राहणाऱ्या राहुल ठोंबरे याच्यासोबत उमेश कन्हान नदी काठावर फिरायला गेला होता. तिथे दोघे काही वेळ शंकरजीच्या मंदिरात बसले. नंतर पोहण्यासाठी नदीत उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज आला नसल्याने ते बुडाल्याची माहिती आहे. उमेश हा गोरेवाडा, नागपूर येथील राहणारा होता. तो खासगी व्यवसाय करायचा. राहुल हा मौदा येथील एनटीपीसी येथे काम करायचा. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
शोध मोहीम सुरूच
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मलिक विराणी यांनी प्रशासनाला निर्देश देत बोटीच्या माध्यमातून दोघांचा शोध सुरू केला. मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत दोघेही नदी पात्रात कुठेही आढळले नाहीत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक हेमंत खराबे आणि मोदा पोलीस उपस्थित होते.