मायलेकी गंभीर : कोंढाळी-काटोल मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडककोंढाळी/कामठी : दोन विविध ठिकाणी घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. कोंढाळी-काटोल मार्गावर झालेल्या अपघातात पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सात वर्षीय मुलीसह तिची आई गंभीररीत्या जखमी झाली. अपघाताची दुसरी घटना कामठी-कळमना मार्गावर घडली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.कोंढाळी येथील विकासनगर येथील रहिवासी रमेश मारोती कांबळी (३५) हे रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास पत्नी ज्योत्स्ना व मुलगी इच्छा यांच्यासह कोंढाळी-काटोल मार्गावरील बहिरमबाबा मंदिरात कार्यक्रमानिमित्त जात होते. दरम्यान, कोंढाळीपासून एक किमी अंतरावरील व्यास यांच्या शेतानजीक काटोलकडून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीचालक रमेश कांबळी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पत्नी ज्योत्स्ना रमेश कांबळी (३०) व मुलगी इच्छा रमेश कांबळी (७) या मायलेकी गंभीर जखमी झाल्या.एका खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या रमेश कांबळी यांनी नुकतीच दुचाकी खरेदी केली होती. दरम्यान, बहिरमबाबा मंदिरातील पौष रविवारच्या महाप्रसादाकरिता ते आपल्या कुटुंबीयासह जात होते. दरम्यान, वाटेतच हा अपघात घडल्याने रमेशचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कोंढाळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी मायलेकींना कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचाराअंती दोघींनाही नागपूर शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणी साठी नागपूर मेडिकलला पाठविण्यात आला. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.अपघाताची दुसरी घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रनाळा शिवारातील पेट्रोलपंपासमोर रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पिंटू देवेंद्र लाडे (२१, रा. संजय गांधीनगर, राणी दुर्गावती चौक, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. पिंटू लाडे व त्याचा मित्र मंगल मोहनलाल सुखदेवे (२४, रा. नागपूर) हे दोघेही एमएच-४९/एक्स-३७०३ क्रमांकाच्या दुचाकीने कामठीहून नागपूरकडे जात होते. दरम्यान कामठी-कळमना मार्गावरील रनाळा शिवारातील पेट्रोलपंपासमोर नागपूरकडून कामठीकडे जाणाऱ्या एमएच-४०/६००९ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकी चालक पिंटू लाडे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र मंगलला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर ट्रक घटनास्थळी सोडून चालक पसार झाला.अपघाताची माहिती मिळताच, नवीन कामठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून जखमी मंगल यास रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३०४ (अ) मोटर वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रमेश विंचूरकर, देवीदास मंडली करीत आहेत. (वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)
अपघातात दोघांचा मृत्यू
By admin | Published: February 08, 2016 3:22 AM