लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी (दि. १९) रेल्वेस्टेशनच्या पश्चिम प्रवेशद्वारावरील ट्रॅफिक बूथच्या शेडमध्ये बॉटल घेऊन बसलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांचा फोटो व व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ माजली आहे.
सोमवारी सकाळी ११.३० वाजता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बूथला लागून असलेल्या शेडमध्ये बसलेल्या ट्रॅफिक व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ तयार केला. दरम्यान, खुर्चीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हाती असलेली बॉटल व्हिडिओमध्ये आलेली आहे. या पोलिसाने बॉटल लपविण्याचा बराच प्रयत्न केला असल्याचेही व्हिडिओत दिसून येते. हा फोटो आणि व्हिडिओ माध्यमांकडे पोहोचल्यावर पत्रकारांनी घटनास्थळाची खात्री करण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या ट्रॅफिक बूथचे निरीक्षण केले असता, फोटो व व्हिडिओतील घटनास्थळ एकच आढळले. वेळू आणि बल्लीच्या शेडला लागून असलेल्या भिंतीजवळ काही प्लास्टिक ग्लास पडून होते. स्थानिकांशी विचारपूस केली असता, रेल्वेस्थानकाच्या सरकारी आवारात रोज सकाळी ९.३० वाजता काही लोक शेडमध्ये बॉटल घेऊन बसत असल्याचे स्पष्ट झाले. यात काही पोलीसही असल्याने, त्यांना टोकण्यास स्थानिक लोक टाळाटाळ करीत असतात.
फोटो मिळताच तपासासाठी पोहोचले ट्रॅफिक एसीपी
फोटो व व्हिडिओमध्ये रहदारी विभागाची वेशभूषा असलेले व काही खाकी पोशाखात असलेले कर्मचारीही दिसत आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता रहदारी विभाग (शहर)चे प्रभारी सहायक आयुक्त अजय कुमार मालवीय यांनीही तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. तेथे शहर ट्रॅफिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून चौकशी केली असता स्टेशनचे ट्रॅफिक बूथ जीआरपीअंतर्गत येत असल्याची माहिती मिळाली.
प्रकरणाची चौकशी होणार
रेल्वे स्टेशन ट्रॅफिक बूथचे व्हायरल फोटो जीआरपीचे अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास केला जाईल आणि यात जीआरपीचे कर्मचारी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
............