नागपूर :काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर स्वरुपाची टीका करणे माजी आ. आशिष देशमुख यांना शेवटी महागात पडले आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने देशमुख यांच्या आरोपांची गंभीर दखल घेत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून निलंबित केले आहे. आशिष देशमुख मागील काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेस नेत्यांवर आक्षेपार्ह आरोप व टीका करीत आहेत. नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले.
राहुल गांधींनी ओबीसी समुदायाची माफी मागावी, असा सल्ला त्यांनी राहुल गांधी यांना दिला. तर नाना पटोले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दरमहा एक खोका (एक कोटी रुपये) घेतात, असा गंभीर आरोपही केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची ५ एप्रिल रोजी बैठक झाली.
त्यावेळी या आरोपांची गंभीर दखल घेत आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावत तीन दिवसात लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. सोबतच त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करीत स्पष्टीकरण सादर न केल्यास पुढील कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. विशेष म्हणजे, खोटे आरोप करून बदनाम करणे हा भाजपचा अजेंडा आहे. मात्र, आपण सातत्याने काँग्रेस नेत्यांवर टीका करीत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले आहे, असा शेराही समितीने दिला आहे.
पटोलेंवर सातत्याने वार
- आशिष देशमुख हे सातत्याने पटोले यांच्यावर शाब्दिक वार करीत आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक सुरू असताना प्रदेशाध्यक्ष पदाचीही निवडणूक घ्यावी, अशी मागणी करीत त्यांनी नाना पटोले यांच्या थेट नियुक्तीवरच आक्षेप घेतला होता. एवढेच नव्हे तर अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल हे पटोले यांचे लाड पुरवत असल्याचा आरोप करीत त्यांचा महाराष्ट्रातील हस्तक्षेप थांबविण्याची मागणी करीत देशमुख यांनी वेणुगोपाल यांच्यावरही नेम साधला होता.