आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील ग्रामीण भागाला राज्य सरकारने मोठा दिलासा दिलासा दिला आहे. सरकारने गावठाणाची हद्द २०० मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संबंधित हद्दीतील जमीन ही अकृषक झाल्याचे मानून यावर झालेली सर्व बांधकामेही नियमित केली जाणार आहेत.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (पाचवी सुधारणा) विधेयक, २०१७ शुक्रवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित विधेयक मांडताना सांगितले की, संबंधित निर्णयामुळे गावठाणाबाहेरील २०० मीटरच्या हद्दीत झालेल्या बांधकामांना तर फायदा होईल. सोबतच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्यात १२ लाख घरांचे बांधकाम करायचे आहे. त्यासाठीही मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध होईल. याशिवाय या वाढीव हद्दीतील गायराणाची जमीन आता सरकारी कामासाठी घेता येईल. या जमिनीवर कुठलेही शासकीय बांधकाम करता येईल. येथे तुकडाबंदी कायदा लागू होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.