दोन गट आपसात भिडले : नगरसेवक, पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखलनागपूर : बहुजन समाज पार्टीचे दोन गट रविवारी आपसात भिडले. आमदार निवासात आयोजित कार्यक्रमावरून झालेला हा वाद अखेर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. बसपाच्या असंतुष्ट गटाने केलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणी बसपाचे पदाधिकारी व नगरसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. बसपाच्या असंतुष्ट गटाने रविवारी दुपारी आमदार निवासात खुले चर्चासत्र आयोजित केले होते. प्रदेशाध्यक्ष विलास गरुड हटाव, बसपा बचाव, हा चर्चासत्राचा विषय होता. दुसऱ्या गटातील बसपाचे जिल्हा व प्रदेशस्तरीय पदाधिकाऱ्यांनी दुपारी २ वाजता सीताबर्डी पोलीस ठाण्यात पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांकडून बसपाचा लोगो व ध्वजाचा वापर करीत असल्याची तक्रार करीत आक्षेप घेतला. यानंतर बसपाचे जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, प्रदेश सचिव जितेंद्र म्हैसकर, मो. इब्राहीम टेलर, मो. जमाल, अविनाश नारनवरे, विलास सोमकुंवर, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, योगेश लांजेवार, पृथ्वीराज शेंडे आणि इतर कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यांनी आयोजकांना शिवीगाळ करीत महापुरुषांचे पोस्टर फाडले. माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे यांना जयकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. कार्यक्रमात गोंधळ घातल्याने उपस्थित कार्यकर्तेही संतापले. महिला कार्यकर्त्या गोंधळ घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मारायला धावल्या. दोन्ही गट आपसात भिडले. परंतु पोलिसांच्या मध्यस्तीमुळे मारहाणीची मोठी घटना टळली. असतुंष्ट गटाने यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीताबर्डी पोलिसांनी उपरोक्त पदाधिकारी व नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्या धोरणाविरुद्ध पक्षाला नुकसान होत आहे. त्यामुळे विलास गरुड हटाव , बसपा बचाव, या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम घेऊन त्यावर मंथन करण्याचा अधिकार आहे. विरोधी गटाला काही आक्षेप होता तर त्यांनी सभागृहाबाहेर राहून नारेबाजी करायला हवी होती. परंतु त्यांनी तसे न करता अनधिकृतपणे आमच्या कार्यक्रमात घुसून गोंधळ घालीत कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. सभागृहात लागलेल्या महापुरुषांचे पोस्टर व बॅनर फाडले. आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. - सागर डबरासे,माजी प्रदेश सचिव, बसपा बसपामधून निलंबित करण्यात आलेले बुद्धम राऊत, सागर डबरासे, उत्तम शेवडे, किशोर उके यांनी आमच्या पक्षाचे चिन्ह, लोगो आणि ध्वजाचा गैरवापर करून कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम अनधिकृतच होता. यापूर्वी सुद्धा त्यांनी असेच कार्यक्रम घेऊन पक्ष व प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही या संदर्भात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. पोलिसांच्या मदतीने कार्यक्रम उधळून लावला. आमचे पदाधिकारी जेव्हा परत जात होते, तेव्हा रोजंदारीवर आणलेल्या महिलांनी शिवीगाळ केली. - नागोराव जयकर, जिल्हाध्यक्ष बसपा
बसपात घमासान
By admin | Published: March 27, 2017 2:01 AM