नागपूर : लोकमतचा हा वर्धापन दिन चिरस्मरणीय ठरला. सकाळी टेकडी गणेश मंदिरातील मंजूळ घंटा आणि गणेश वंदनेने दिवस सुरू झाला. तो सायंकाळी विविध धर्मस्थळावरील प्रार्थनांच्या स्वरांनी आणि सर्वधर्म समभावाचा जागर करीत मावळला. प्रारंभापासूनच सर्वधर्म समभाव आणि सहिष्णूतेचे व्रत घेतलेल्या ‘लोकमत’ ने सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून बुधवारी वर्धापन दिनी शहरातील सर्व धर्मस्थळी नमन केले. वर्धापन दिनाचा अंक आणि प्रसादाची भेट अर्पण केली.
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या समवेत कार्यकारी संचालक देवेंद्र दर्डा यांनी प्रारंभी नागपूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपतीचे दर्शन घेऊन ५० किलोंचा लाडू अर्पण केला. त्यानंतर विजय दर्डा यांनी दुपारी गुरूद्वारा गुरू रामदासपेठ येथे जाऊन दर्शन घेतले. मुख्य ग्रंथी कथावाचक गॅनी चरणसिंग चंन आणि सेवक अमृतपालसिंग सचदेव यांनी अरदास पठन केले.
हे प्रार्थनेचे स्वर मनात साठवत त्यांनी जगाला शांतीचा आणि बौद्ध धम्माचा संदेश देणाऱ्या दीक्षाभूमीला भेट देऊन वंदन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली व अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यावेळी भन्ते सुगत यांच्या उपस्थितीत दीक्षाभूमी स्मारक समितीचे ट्रस्टी विलास गजघाटे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. भुवनेश्वरी मेहरे, निळू भगत, मधुकर मेश्राम, भन्ते महातिस्स त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
नागपूर आणि विदर्भवासीयांचे श्रद्धास्थान असलेले मोठा ताजबाग येथेही लोकमतने दुवा मागितली. डोक्यावर फुले आणि चादर वाहून नेत जियारत केली. हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे चेअरमन प्यारे जीयाखान, सचिव ताज अहमद राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्ग्यावर चादर चढविली.
खादीम अब्दुल हसन ताजी आणि खादीम अजरूद्दीन ताजी यांनी फातिया पढली. देशात शांतता, सद्भाव, स्थैर्य लाभू दे, सर्वांचे आरोग्य उत्तम ठेव, लोकमतची मानवसेवा अहर्निश सुरू राहून यातून मानवसेवेसाठी अधिक बळ मिळू दे अशी प्रार्थना केली. यावेळी दर्गा प्रमुख सज्जादा नसिन सैयद तालेफ बाबा, खुद्दाम दर्गा ट्रस्टचे सैयद महंमद मोबिन ताजी, कादरभाई, राहुल आणि कर्मचारी उपस्थित होते. उंटखाना येथील होली फॅमिली चर्चमध्ये ही जाऊन प्रेअर करण्यात आली. येथील होम फॉर एजेड ॲण्ड हॅडिकॅप्डच्या प्रार्थना मंदिरात दर्शन घेतले. यावेळी सेक्रेटरी आयरिन, सुप्रिटेंडंट आयडा, मॅनेजर दिव्या आणि मेंबर मार्या प्रामुख्याने उपस्थित होत्या. येथील स्वाक्षरी बुकात दर्डा यांनी अभिप्रायही नोंदविला.
ही परिक्रमा सायंकाळी दर्डा यांच्या निवासस्थानी असलेल्या जैन मंदिरात पूर्ण झाली. येथेही त्यांनी प्रार्थना केली. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भावना जपत आपल्या मंदिरात पवित्र धर्मग्रंथांसह हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई, बुद्धांनाही दिले आहे. या सर्वांचे दर्शन त्यांनी घेतले.
गीताबाई ताकसांडे यांनी दिले आशीर्वाद
दीक्षाभूमी वरून परतताना गीताबाई ताकसांडे या वयोवृद्ध महिलेची भेट झाली. लोकमतच्या सामाजिक लढ्याची जाण असलेल्या गीताबाई यांनी बाबूजींचा उल्लेख करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. लोकमतच्या पुढील वाटचालीसाठी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आशीर्वाद ही दिले.
...