लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : वीज केंद्राच्या ॲश डॅममध्ये मित्रांसाेबत पाेहायला गेलेला १६ वर्षीय मुलगा बुडाला. बचाव पथकाने सायंकाळपर्यंत त्याचा शाेध घेतला असता, ताे गवसला नाही. ही घटना काेराडी (ता. कामठी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खसाळा-मसाळा शिवारात रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
शशांक विकास नारनवरे (वय १६, रा. बाबादीपसिंग नगर, नागपूर) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. खसाळा-मसाळा (ता. कामठी) शिवारात तलाव असून, त्यात वीज केंद्रातील राख साठवून ठेवली जाते. हा तलाव हनुमान / बजरंग ॲश डॅम नावाने ओळखला जाताे. शशांक रविवारी सकाळी त्याचा लहान भाऊ व पाच मित्रांसाेबत या तलावात पाेहण्यासाठी आला हाेता. सर्वजण तलावात उतरले. काही वेळाने शशांक खाेल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला आणि बुडाला.
ताे बुडत असल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. एवढेच नव्हे तर त्यांनी तिथून पळदेखील काढला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. शशांकचा शाेध घेण्यासाठी पाेलिसांनी नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या बचाव पथकाला पाचारण केले. बचाव पथकातील जवानांनी सायंकाळपर्यंत त्याचा तलावात शाेध घेतला. अंधारामुळे शाेधकार्य थांबविण्यात आले हाेते. मात्र, ताेपर्यंत शंशांक बचाव पथकातील जवानांना गवसला नव्हता, अशी माहिती काेराडीचे ठाणेदार गंगावणे यांनी दिली.
सुरक्षारक्षकांचा अभाव
या ॲश डॅममध्ये काेराडी वीज केंद्रातील राख साेडली जाते. या तलावाच्या परिसरात अथवा तलावात कुणीही जाऊ नये, यासाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामाचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे. घटनेवेळी तलावाजवळ सुरक्षारक्षक तैनात नव्हते. मुले तलावात पाेहायला गेले त्या ठिकाणी सुरक्षारक्षक असते तर ही घटना घडली नसती. त्यामुळे हा कंत्राट रद्द करण्यात यावा; तसेच मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी युवासेनेचे गणेश साेलंके यांनी केली आहे.