आरपीएफने घेतले ताब्यात : गीतांजली एक्स्प्रेसमधील घटनानागपूर : घरगुती कारणावरून वडिलांशी भांडण झाल्यामुळे एक १७ वर्षाचा विधी संघर्षग्रस्त बालक शिवपूर हावडा येथून घर सोडून गीतांजली एक्स्प्रेसने मुंबईला जात होता. या युवकाला रेल्वे सुरक्षा दलाने गीतांजली एक्स्प्रेस नागपुरात आल्यानंतर खाली उतरविले. रात्री उशिरा त्याचे पालक आल्यानंतर या युवकास त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना शुक्रवारी रात्री व्हॉट्स अपवर संबंधित मुलगा वडिलांच्या रागावर गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बसून मुंबईला जात असल्याची सूचना मिळाली. त्यांनी त्वरित याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचा जवान विकास शर्मा यास देऊन गीतांजली एक्स्प्रेसची तपासणी करण्यास सांगितले. ही गाडी शनिवारी सकाळी ७.०५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ३ वर पोहोचली. आरपीएफ जवान विकास शर्मा, डी. बी. इबितवार, महिला आरक्षक संजु, रोशनी फाटे, नवीन कुमारी यांनी व्हॉट्स अपवरील फोटो पाहिल्यामुळे या गाडीची तपासणी केली असता संबंधित वर्णनाचा बालक एस १२ कोचच्या बाहेर फिरताना आढळला. लगेच त्यास त्याच्या बॅगसह गाडीतून खाली उतरविण्यात आले. त्याच्या पालकांना याची सूचना देण्यात आली. त्याचे पालक रात्री हावडा दुरांतोने नागपुरात आल्यानंतर या बालकास त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. (प्रतिनिधी)
वडिलांच्या रागामुळे बालकाने सोडले घर
By admin | Published: April 10, 2016 3:22 AM