नागपूर : दुर्गादेवीच्या विसर्जनावरून परतणाऱ्या चौदा वर्षीय मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. एमआयडीसीतील बालाजी नगरमध्ये हा अपघात झाला. अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दोन दिवसांत विजेच्या धक्क्याने तिघांना जीव गमवावा लागला आहे. पीयूष केशव कवडे असे मृताचे नाव असून तो बन्सी नगर येथील रहिवासी आहे.
बन्सी नगरमध्ये दुर्गा मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. गुरुवारी रात्री वेणा नदीत मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी वस्तीतील नागरिक व लहान मुले सहभागी झाली होती. पीयूषही त्याच्या वयाच्या मुलांसह गेला होता. विसर्जनानंतर रात्री दहा वाजता पीयूष आपल्या समवयस्कांसह परतत होता. पीयूषच्या हातात एक पाईप होता ज्यावर झेंडा होता. परतत असताना बालाजी नगरजवळ पीयूषने झेंडा हवेत फडकावण्यास सुरुवात केली. दरम्यान, पाइपचा विजेच्या डीपीला स्पर्श झाला. डीपीचा विद्युत प्रवाह पाईपमध्ये गेल्याने पीयूष बेशुद्ध पडला.
अचानक झालेल्या या अपघातामुळे विसर्जन करून परतणाऱ्या नागरिकांमध्ये खळबळ माजली. त्यांनी पीयूषला डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पीयूषच्या मृत्यूचे वृत्त समजताच बन्सी नगरात शोककळा पसरली. पीयूष नववीच्या वर्गात शिकत होता. त्याला एक लहान भाऊ आहे. त्याचे वडील ड्रायव्हर आहेत. एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, दोन दिवसांत विजेच्या धक्क्याने तीनजणांना जीव गमवावा लागला आहे. पारडी येथे विजयादशमीच्या दिवशी साईबाबा पुण्यतिथी सोहळ्यात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता, तर एमआयडीसीतील एका कंपनीत एका तरुण सफाई कामगाराचा मृत्यू झाला होता.