लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणू संसर्ग संशयित रुग्णांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आज शनिवारी यातील अनेक संशयित रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागला. परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरावर चाल करून त्यांना परिसरातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तसेच सामाजिक बहिष्कार घालण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान ही यादी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान या प्रकरणात विभागीय आयुक्तांसारख्या जबाबदार अधिकाऱ्यांचे नाव आल्याने हे प्रकरण आणखीनच गंभीर झाले आहे.शनिवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीतही हा विषय उपस्थित झाला होता. कोरोना कॉरंटाईन असा स्टॅम्प असलेल्या एका व्यक्तीच्या घरावर २०० ते ३०० लोक चालून गेले. ते त्यांना परिसरातून हाकलण्याचा प्रयत्न करीत होते. पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेत यासंदर्भात प्रशासन व पोलिसांना सक्त कारवाईची ताकीद देण्यात आली आहे. जी यादी व्हायरल झाली ती अधिकाऱ्यांकडून जाहीर झालेली नाही. कुणीतरी ती लिक केल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीसुद्धा कोरोना संशयित रुग्णाची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार चुकीचा असल्याचे सांगितले. देशाच्या दृष्टीने असे करणे चुकीचे असून आज सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. लोकमतने यासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही यादी आपल्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले.प्रशासनाने घेतली गंभीर दखल, गुन्हा दाखल होणारकोरोना विषाणू संसर्ग संशयित रुग्णांची यादी सोशल मीडिया आणि काही माध्यमावर प्रसिद्ध झाल्याची बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.प्रशासन व पोलीस विभागाला सक्त कारवाईची ताकीदसंशयित रुग्णांची यादी व्हायरल होणे आणि त्यामुळे संशयित रुग्णांना झालेला मनस्ताप याची गंभीर दखल घेण्यात आली असून प्रशासन व पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.नितीन राऊत, पालकमंत्री‘त्या’ यादीत अनेक महिलांचीही नावेसंशयित रुग्णांच्या व्हायरल झालेल्या त्या यादीमध्ये अनेक महिलांचीही नावे आहेत. त्यामुळे या महिलांबाबतही उद्या असाच प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा ही यादी व्हायरल करणे आणि प्रसिद्ध करणे हा निश्चितच मोठा गुन्हा असून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, अशी मागणी होत आहे.
नागपुरातील कोरोना संशयितांवर बहिष्काराचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:57 PM
कोरोना विषाणू संसर्ग संशयित रुग्णांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आज शनिवारी यातील अनेक संशयित रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागला.
ठळक मुद्दे‘ती’ यादी आमच्याकडून जाहीर झालेली नाही : विभागीय आयुक्तांचे स्पष्टीकरण