विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार; पायर्यांवर ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 11:27 AM2022-12-23T11:27:33+5:302022-12-23T11:30:32+5:30
Winter Session Maharashtra 2022 : विधान परिषदेच्या कामकाजाला विरोधी पक्षाचे आमदार सहभागी होणार
नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून काल सभागृहात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विधानावरून उडालेल्या गोंधळानंतर आजचा दिवसदेखील चांगलाच गाजणार असल्याचे चित्र आहे. काल घडलेल्या प्रकारानंतर आमदार जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांनतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
कर्नाटक सरकारचा निषेध करतानाच आमदार जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून सभागृहात न जाता पायर्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना म्हणाले,जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेत त्यांना सभागृहात बसू द्यावे, अशी आमची मागणी आहे. मात्र, ती मान्य होत नसल्याने आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.
काल ज्येष्ठ नेते व आमदार जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईचा निषेध करत महाविकास आघाडीने गुरुवारी सभात्याग केला होता. तीच भूमिका कायम ठेवत आज शुक्रवारी विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला. त्यांचं निलंबन मागे घेण्यात यावं ही आमची मागणी असून विधानसभेच्या कामकाजावर आम्ही बहिष्कार टाकला आहे, असे अजित पवार म्हणाले. जयंत पाटील यांना अडकविण्यासाठी राजकारण करून चित्र रंगवण्यात आलं असल्याचे पवार म्हणाले. तर, कर्नाटक सरकार महाराष्ट्राला एकही इंच जागा न देण्याचा ठराव करत आहे. आता तरी आपल्या सरकारने सीमावादावर ठराव आणावा. आमचा त्याला विरोध राहणार नाही.' असं जितेंद्र आव्हाड म्हणाले,
एयू म्हणजे अनन्या उदास
सत्तापक्ष गैरसमज पसरवित आहे. काल एयू वरून त्यांनी गदारोळ केला. वास्तविक पाहता रिया चक्रवर्तीने स्वतः एयू म्हणजे अनन्या उदास हे स्पष्ट केले आहे. अनन्या ही माझी मैत्रिण आहे, हे आता स्पष्ट झाले आहे,' असे अजित पवार म्हणाले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी बसवून सरकार ३२ वर्षीय तरुणाला किती घाबरले आहे, हे दिसून आल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
सरकारचे 'सत्तामेव जयते'
आम्ही सत्यमेव जयते हे तत्व मानणारे आहोत तर सरकार सत्तामेव जयते मानते. सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दबणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
लोकशाहीसाठी काळा दिवस
जयंत पाटील यांचे निलंबन लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. कर्नाटक सरकार कुरघोडी करत असताना आपले सरकार काहीच करत नसल्याचा खेददेखील त्यांनी व्यक्त केला.