नागपूर : प्रियकर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे समजल्यानंतर तरुणीने त्याच्यापासून दुरावा करीत सर्व प्रकारचे संबंध तोडले. हे प्रियकराला सहन झाले नाही व तो तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या घरी पोहोचला. तरुणीशी वाद घातल्यानंतर त्याने स्कार्फने तिचा गळा आवळला. मात्र, तितक्यात तरुणीचा भाऊ तेथे पोहोचला आणि आरोपीला तेथून पळावे लागले आणि तरुणीचे प्राण वाचले.
ही थरारक घटना कोराडी ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी पिडितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी आदेश दुर्गादास तिरपुडे(वय २३) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, २१ वर्षीय पिडीत तरुणी ही आई-वडील, भाऊ-वहिनी यांच्यासह महादुलाच्या सिद्धार्थनगर परिसरात राहते. तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे आणि गणेशनगर, पांजरा येथील नंदिनी नर्सिंग होम रुग्णालयात ती पारिचारिका आहे. आरोपी आदेश आणि पिडीतेची जुनी ओळख आहे. पूर्वी आदेश पिडितेच्या शेजारीच राहत होता. दरम्यान, त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
आदेश कामधाम करत नव्हता. त्याला चोरीच्या एका प्रकरणात पोलिसांनी अटकही केली होती. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने तरुणीने आदेशपासून दुरावा करीत त्याच्याशी बोलणे बंद केले. यामुळे, आदेशचा तडफडाट झाला. तो तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, तरुणी त्याला प्रतिसाद देत नव्हती. यामुळे रागात फणफणत असलेल्या आदेशने तिला संपवण्याचाच प्लॅन आखला. शुक्रवारी रात्रीच्या वेळी तरुणी घरी एकटीच होती. ही संधी साधत आदेश घरात घुसला. त्याने तिला मारहाण करत विनयभंग करून तिच्या जवळच्या स्कार्फच्या सहाय्याने छताच्या लोखंडी पाइपला बांधून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, शेजारी राहणाऱ्या चुलत भावाला घरात काही आवाज ऐकू येत असल्याने शंका आली. सदर प्रकार लक्षात येताच तरुणीच्या घरी गेला. त्यामुळे आदेशने घरातून पळ काढला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आद्याचा शोध सुरू केला आहे.