नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निशांत अग्रवालची लिंक सेजल आणि नेहाच्या माध्यमातून थेट पाकिस्तान तसेच कॅनडात जुळली होती. त्यामुळे ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती, देखभाल आणि त्या संबंधाची माहिती तसेच भारतीय सुरक्षेसंदर्भातील संवेदनशील माहिती पाकिस्तान आणि कॅनडात बसलेल्या ‘बॉस’कडे पोहचत होती, अशी प्रचंड खळबळजनक माहिती सूत्रांच्या माध्यमातून पुढे आली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची हेर असलेल्या एका तरुणीच्या (फेसबुक फ्रेण्ड) माध्यमातून पाकिस्तान, कॅनडासह अमेरिकन गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी करण्याचा गंभीर आरोप निशांत अग्रवालवर आहे. उत्तर प्रदेश एटीएस आणि मिलिटरी इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी अग्रवालला सोमवारी सकाळी नागपुरात बेड्या ठोकल्या. तेव्हापासून राज्याच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ताब्यात घेतल्यापासून अर्थात ३५ तासांपर्यंत अग्रवालची तपास यंत्रणांनी चौकशी केली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, त्याचे संगणक, मोबाईल आणि सीडीजच्या माध्यमातून त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून तपास यंत्रणांनी अत्यंत धक्कादायक माहिती मिळवल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. विशेष म्हणजे, आज दिवसभर अग्रवालची तपास अधिकाऱ्यांनी एटीएसच्या कार्यालयासह काही विशिष्ट ठिकाणी नेऊनही चौकशी केली. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले. यासंदर्भात बाहेर कसलीही माहिती जाऊ नये, याची खास काळजी तपास यंत्रणांनी घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी सेजल आणि नेहासोबत निशांतची फेसबुकवरून मैत्री झाली. सेजलने आपण कॅनडात तर नेहाने आपण पाकिस्तानात मोठ्या हुद्यावर नोकरी करतो, असे सांगून निशांतवर जाळे फेकले. त्याच्याशी प्रारंभी या दोघी सहज मैत्रीच्या गोडगुलाबी गप्पा करीत होत्या; नंतर ‘तू एवढा ब्रिलियन्ट आहे. तेथे काय करतो, असा प्रश्न करून त्याला विदेशात लठ्ठ पगाराची नोकरी का करीत नाही, असे म्हणून आपल्या जाळ्यात ओढले. हो-नाही म्हणत मागे-पुढे पाहणाऱ्या निशांतला त्यांनी अशी काही आॅफर दिली की तो त्यांच्या जाळ्यात फसलाच.
३० हजार यूएस डॉलरची आॅफर!
सूत्रांच्या माहितीनुसार, सेजल आणि नेहा निशांत अग्रवालला बेमालूमपणे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून माहिती काढून घेत होत्या.एकीने त्याला कॅनडात तर दुसरीने पाकिस्तानमध्ये नोकरीचे आमिष दाखवून ३० ते ३८ हजार यूएस डॉलर पॅकेजची आॅफर दिली होती. एवढा मोठा पगार मिळणार म्हणून अग्रवाल चक्रावला आणि नंतर त्याने या दोघींना जी पाहिजे ती माहिती उपलब्ध करून दिली.काय आहे ब्रह्मोसब्रह्मोस एक मध्यम अंतराचे सुपरसोनिक मिसाईल आहे. ते जमीन, पाणी किंवा आकाशातूनही शत्रूचा वेध घेऊ शकते. जगातील सर्वात वेगवान मानली जाणारे क्रूज मिसाईल ब्रह्मोस भारत आणि रशियाने संयुक्त प्रयत्नातून विकसित केलेले आहे.देशाच्या संरक्षणासाठी आणि शत्रू राष्ट्राला धडा शिकविण्यासाठी कामी येणाऱ्या या अत्यंत संवेदनशील आणि गौरवशाली प्रकल्पात सिनियर सेक्शन इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या अग्रवालने हेरगिरी करणाऱ्या फेसबुक फ्रेण्डच्या प्रेमात आणि आमिषाला बळी पडून मोठा धोका केला आहे. दरम्यान, त्याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करून यूपी एटीएसने त्याचा तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मिळवला. यावेळी न्यायालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. न्यायालयातून त्याला एटीएसच्या सिव्हिल लाईन कार्यालयात नेण्यात आले. तेथेही सायंकाळपर्यंत मोठा बंदोबस्त होता. एटीएसच्या कार्यालयाच्या दारासमोर घुटमळणारालाही लगेच हुसकावून लावले जात होते. पत्रकार किंवा अन्य कुणालाच तपास अधिकाऱ्यांसोबत भेटण्याची अथवा बोलण्याची संधी देण्यात आली नाही. त्याला रात्रीच्या विमानाने दिल्लीमार्गे लखनौला नेण्यात आले आहे. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. ज्या वाहनातून अग्रवालला विमानतळावर नेण्यात आले, त्या वाहनाच्या मागेपुढे आणि आजूबाजूलाही सुरक्षा यंत्रणांमधील वाहने लावण्यात आली होती.