सुमेध वाघमारे, नागपूर: अवयवदानाचे महत्त्व आता शहरापुरतेच मर्यादित नाही तर ग्रामीण भागातही पोहचले आहे. दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानादेखील समाजभान राखत निर्णय घेतला जात आहे. गुरुवारी भंडाºयात ‘ब्रेन डेड’ झालेल्या व्यक्तीचा अवयवदानासाठी नागपुरात नेण्यासाठी कुटुंबियाने पुढाकार घेतला. यामुळे अवयवाच्या प्रतिक्षेत मृत्यूच्या दाढेत जगत असलेल्या तीन रुग्णांना नवे आयुष्य तर दोघांना दृष्टी मिळणार आहे.
रामदास गणपत सिंगनजुडे, (४९) असे अवयवदात्याचे नाव आहे. लाहोटी, बेला, जि. भंडारा येथील सिंगनजुडे हे व्यवसायाने वाहन चालक आहेत. प्राप्त माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी सिंगनजुडे यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली. भंडाºयातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. अचानक झालेल्या या घटनेने त्यांच्या पत्नी मालती, १९ वर्षीय मुलगी, मोठा भाऊ रामदास सिंगनजुडे (६०) यांना मोठा धक्का बसला. डॉक्टरांनी अवयवदान करण्याचा सल्ला दिला. भाऊ रामदास यांनी आपल्या छोट्या भावाला अवयवरुपी जीवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. याची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) देण्यात आली. परंतु भंडाºयातील कोणत्याच रुग्णालयाला अवयव काढण्याची मंजुरी प्राप्त नाही. यामुळे ‘ब्रेन डेड’ व्यक्तीला नागपुरात आणणे गरजेचे होते. यासाठीही कुटुंबियानी मंजुरी दिली. त्यानुसार गुरुवारी दुपारी नागपुरातील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ‘झेडसीसी’ने नियमानुसार दोन्ही मूत्रपिंड व यकृताचे आणि मेडिकलच्या नेत्ररोग विभागाला कॉर्नियाचे दान के ले.-वयोवृद्ध रुग्णावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ‘झेडसीसी’ने मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ६३वर्षीय पुरुष रुग्णाला एक मूत्रपिंड तर याच वयोगटातील पुरुष रुग्णाला यकृताचे दान केले. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू होती तर, दुसरे मूत्रपिंड किम्स किंग्सवे हॉस्पिटलचा ३० वर्षीय पुरुष रुग्णाला दान करण्यात आले.