लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विहिरीचे काम करीत असताना २१ वर्षीय मजूर खाली उभ्या सळाखीवर पडला. मेंदू आणि डावा हात छेदून सळाख आरपार बाहेर निघाली. सळाखी कापून त्याला तातडीने गोंदिया येथील इस्पितळात नेले. तेथून नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. प्रमोद गिरी आणि त्यांच्या चमूने शर्तीचे प्रयत्न केले. अडीच तासाच्या शस्त्रक्रियेनंतर मेंदूतून सळाख बाहेर काढण्यास यश आले. डॉक्टरांचे कौशल्य आणि दैव बलवत्तर होते म्हणून मजुराला नवे जीवन मिळाले.संजय बाहे (२१) रा. बालाघाट, हे मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर आलेल्या तरुण मजुराचे नाव.प्राप्त माहितीनुसार, संजय बाहे हा विहीर बांधण्याचे काम करतो. बुधवार १० एप्रिल रोजी सकाळी विहिरीचे बांधकाम सुरू असताना अचानक त्याचा तोल गेला. विहिरीच्या तळाला उभ्या करण्यात आलेल्या सळाखीवर तो जाऊन पडला. एक सळाख त्याच्या डाव्या डोक्यातून मेंदूला छेदत उजव्या बाजूने निघाली. डाव्या हाताच्या ढोपराच्यावरही सळाख खुपसली होती. नातेवाईकांनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तातडीने सळाख कापली. गोंदिया येथील एका खासगी इस्पितळात त्याला नेले. येथील शल्यचिकित्सक डॉ. विकास जैन यांनी प्राथमिक उपचार करून तातडीने नागपुरात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी संजयला धंतोली येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता दाखल केले. डॉ. प्रमोद गिरी यांनी त्याला तपासून तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. संजय शुद्धीवर असला तरी या घटनेचा मोठा मानसिक धक्का बसला होता. डॉक्टरांनी त्याला रक्त चढवून शस्त्रक्रियेला सुरूवात केली. तब्बल अडीच तास शस्त्रक्रिया चालली. मेंदूत खुपसलेली सळाख रक्तवाहिनीला इजा हाऊ न देता बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. या शस्त्रक्रियेसोबतच हातात शिरलेली सळाखही बाहेर काढली. ही शस्त्रक्रिया, डॉ. गिरी यांच्या नेतृत्वात बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. शिवाजी देशमुख, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. योगेश देशमुख, जनरल सर्जन डॉ. कन्हैया चांडक, अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ डॉ. सुशांत आदमने व न्यूरॉन हॉस्पिटलच्या चमूने यशस्वी पार पाडली.मेंदूचा रक्तवाहिनीला इजा होण्याची शक्यता होतीडॉ. प्रमोद गिरी म्हणाले, या शस्त्रक्रियेत मेंदूला रक्तपुरवठा करणाºया रक्तवाहिनीला इजा होऊ न देणे व मेंदूत रक्तस्राव होऊ न देणे हा उद्देश ठेवून शस्त्रक्रियेला सुरुवात केली. यासाठी आम्ही मानेवरच रक्तपुरवठा करणाºया वाहिनेवर ताबा (ब्लॉक) घेतला होता. खुपसलेली सळाक गंजलेली व धारदार होती. ती काढण्यास जागा मिळावी म्हणून डोके उघडून जागा तयार करण्यात आली. सळाख बाहेर काढताना रक्तवाहिनी ‘डॅमेज’ होऊन जीव जाण्याचा धोका होता. यामुळे मोठ्या कौशल्याने सळाख बाहेर काढली. यशस्वी शस्त्रक्रियेने आता रुग्ण धोक्याबाहेर आहे, असेही ते म्हणाले. डॉ. गिरी यांनी या पूर्वी एका सात वर्षीय चिमुकलीच्या डाव्या डोळ्यातून मेंदूपर्यंत खुपसलेली १२ सेंटिमीटरची सळाख, आणि डोक्यात खुपसलेला चाकू शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढले आहे.
मेंदू छेदून शिरलेली सळाख काढली बाहेर : मृत्यूच्या दारातून परतला मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:19 PM
विहिरीचे काम करीत असताना २१ वर्षीय मजूर खाली उभ्या सळाखीवर पडला. मेंदू आणि डावा हात छेदून सळाख आरपार बाहेर निघाली. सळाखी कापून त्याला तातडीने गोंदिया येथील इस्पितळात नेले. तेथून नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. प्रमोद गिरी आणि त्यांच्या चमूने शर्तीचे प्रयत्न केले. अडीच तासाच्या शस्त्रक्रियेनंतर मेंदूतून सळाख बाहेर काढण्यास यश आले. डॉक्टरांचे कौशल्य आणि दैव बलवत्तर होते म्हणून मजुराला नवे जीवन मिळाले.
ठळक मुद्देप्रमोद गिरी व चमूच्या प्रयत्नांना यश