भीषण अपघातात डोक्याला बसला होता मार नागपूर : एका भीषण अपघतात १७ वर्षीय युवतीच्या डोक्याला जबर मार बसला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मेंदूमृत (ब्रेनडेड) झाल्याचे सांगितले. अख्खे कुटुंब दु:खात बुडाले. परंतु त्या परिस्थितीतही डॉक्टरांच्या सल्ल्याला गंभीरतेने घेतले. चंद्रपूरमधून विशेष रुग्णवाहिकेने तिला नागपुरात हलविले. तिच्या दोन्ही मूत्रपिंडाच्या दानामुळे गेल्या काही वर्षांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या दोन रुग्णांना जीवनदान मिळाले. पूजा प्रशांत कांचनवार (१७) रा. चंद्रपूर असे त्या मृत युवतीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी पूजा हिचा चंद्रपूर येथे मोठा अपघात झाला. तिला तातडीने चंद्रपूरच्या कोल सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे उपचार केले, परंतु शेवटी हात टेकले. मेंदू मृत झाला होता. परंतु याच्या तपासणीसाठी नागपुरातून डॉक्टरही बोलविण्यात आले होते. त्यांनीही मेंदू मृत झाल्याचे सांगताच कांचनवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. तेथील डॉक्टरांनी त्यापरिस्थितीत हिंमत दाखवीत कांचनवार कुटुंबाला पूजाच्या अवयवदानाचा सल्ला दिला. सुरुवातीला कांचनवार कुटुंबीयांनी त्याकडे दुर्लक्ष केले, परंतु डॉक्टरांनी त्यांच्या एका निर्णयानंतर इतरांचे जीवन वाचू शकते, हे समजवून सांगितल्यावर त्यांनी होकार दिला. वोक्हार्ट हॉस्पिटलने तातडीने पुढाकार घेत, पुढील प्रक्रियेला गती दिली. पूजाला विशेष रुग्णवाहिकेने नागपुरात आणले. ९ एप्रिल रोजी तिचे एक मूत्रपिंड नागपुरातील ४९ वर्षीय पुरुषाला तर दुसरे मूत्रपिंड ३१ वर्षीय महिलेला देण्यात आले. हे दोन्ही रुग्ण गेल्या काही वर्षांपासून मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यूच्या दाढेत जगत होते. यशस्वी प्रत्यारोपणानंतर दोघांना जीवनदान मिळाले. ही संपूर्ण प्रक्रिया वोक्हार्टच्या के. सुजाता यांच्या मार्गदर्शनात पार पडली. प्रसिद्ध किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, डॉ. सूर्यश्री पांडे, डॉ. समीर चौबे, डॉ. राजेश गाडे यांच्या विशेष प्रयत्नामुळे दोन्ही प्रत्यारोपण यशस्वी झाले. विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या पुढाकारामुळे हे मूत्रपिंड प्रत्यारोपण होऊ शकले.(प्रतिनिधी)
ब्रेनडेड युवतीच्या किडनीमुळे दोघांना जीवनदान
By admin | Published: April 11, 2017 1:49 AM