लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा मार्गावर आजूबाजूला असलेल्या सराफा व कपड्याच्या दुकानात शिरून चोरट्यांनी रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास केला. जाता जाता चोरट्यांनी कपड्याच्या दुकानात आगही लावून दिली. ही धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे ३ वाजता सुमारास घडली. दुकान मालकाला वेळीच जाग आल्याने मोठा अनर्थ टळला.भरतवाडा मार्गावरील न्यू हनुमान नगरात गजानन पुरुषोत्तम तिनखेडे यांचे सराफा आणि बाजूलाच कपड्याचे दुकान आहे. लॉकडाऊनमुळे ही दुकाने बंदच आहेत. मात्र, वरच्या माळ्यावरच दुकान मालक राहत असल्याने तिनखेडे यांचे दोन्ही दुकानांवर लक्ष राहते. आज पहाटे ३ च्या सुमारास कपडे जळाल्याचा वास येत असल्याने त्यांच्या पत्नीने त्यांना उठविले. त्यांनी शयनकक्षाचे दार उघडून बघण्याचा प्रयत्न केला असता ते दार बाहेरून लावल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिनखेडे यांनी गॅलरीतून खाली उडी मारली आणि आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. पोलीस आणि अग्निशमन दलालाही सूचना दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेच आग आटोक्यात आणली. दरम्यान, तिनखेडे आणि पोलिसांनी सराफा दुकानात पाहणी केली असता चोरट्यांनी बनावट चावीने सराफा दुकानाचे कुलूप उघडून आत मधील रोख ४० हजार तसेच विविध ग्राहकांनी तिनखेडे यांच्याकडे गहाण ठेवलेले १४ लाख, ३८ हजार, २०० रुपयांचे दागिने चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.चोरट्यांनी कपड्याच्या दुकानाला आग लावण्यापूर्वी तिनखेडे यांच्या घराचे दार बाहेरून बंद केले होते. सुदैवाने आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने आणि तिनखेडे यांनी प्रसंगावधान राखत खाली उडी मारुन शेजाऱ्यांना गोळा करून आपले दार उघडून परिवारातील सदस्यांना बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त असताना ही घटना घडल्याने कळमना परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.
नागपुरात सराफा दुकानात धाडसी चोरी : रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:16 PM
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा मार्गावर आजूबाजूला असलेल्या सराफा व कपड्याच्या दुकानात शिरून चोरट्यांनी रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास केला.
ठळक मुद्देचोरट्यांनी बाजूच्या कापड दुकानाला आगही लावली